एमपीएससी पेपरफुटीवर अध्यक्ष विवेक भीमनवारांचे स्पष्टीकरण

MPSC पेपरफुटीवर अध्यक्ष विवेक भीमनवारांचे स्पष्टीकरण. ठोस पुरावा दिल्यास राजीनाम्याचे आव्हान; MPSC आंदोलनात सुप्रिया सुळे व रोहित पवारांचा सहभाग.

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षां मधील कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि ढिसाळ कारभारावरून राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली असताना, आता आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आपली बाजू स्पष्ट करत मोठी भूमिका मांडली आहे. आपल्यावर सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने आपण व्यथित झालो असल्याचे सांगत, जर आपल्याविरोधात कोणीही एकही ठोस पुरावा सादर केला, तर आपण या पदावर क्षणभरही थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

       औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावर सविस्तर स्पष्टीकरण देताना भीमनवार यांनी स्पष्ट केले की, ही दुर्दैवी घटना त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाने तातडीने पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली असून, सद्यस्थितीत या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांची पुनरावृत्ती पूर्णपणे टाळण्यासाठी आयोगाच्या वतीने एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारनेदेखील यासाठी एक उच्चाधिकार समिती गठीत केली असून, या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी सातत्याने संवाद साधून योग्य ते उपाय योजले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

      आपल्या कार्यकाळातील प्रशासकीय कामगिरीचा लेखाजोखा मांडताना भीमनवार यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात स्पर्धा परीक्षांच्या ८ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षा, अशा एकूण ८४ परीक्षा पार पाडण्यात आल्या आहेत. निकाल प्रक्रियेतही मोठे बदल करण्यात आल्याचा दावा करत आता केवळ १८ ते २१ दिवसांच्या आत स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात पारदर्शकता आणखी वाढवून सर्व परीक्षांचे निकाल एका महिन्याच्या आत जाहीर करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे प्रशासना कडून बचावात्मक पवित्रा घेतला जात असताना, दुसरीकडे MPSC च्या कारभारा विरोधात पुण्यात विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या वतीने एक विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा हजारो विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीतून थेट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी या संपूर्ण गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

       विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आंदोलनाला राज्यभरातून मोठा राजकीय पाठिंबा मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. या मोर्चा निमित्त खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यासह अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते विद्यार्थ्यां सोबत रस्त्यावर उतरले होते. परीक्षा प्रक्रियेतील गंभीर गैरप्रकारांवर आणि पेपरफुटीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे राजकारण नसून तो लाखो होतकरू तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या या तीव्र रोषामुळे आणि राजकीय दबावामुळे MPSC चा हा वाद आता अधिकच पेटला असून, यावर शासन आणि आयोग आगामी काळात काय ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software