मराठा आरक्षणावर सरकारच्या हालचाली वाढल्या; ‘वर्षा’वर मध्यरात्री बैठक

मराठा आरक्षणावर 'वर्षा' निवासस्थानी मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक. मनोज जरांगे पाटील उपचारांसाठी तयार, नाशिकमध्ये मराठा संघटनांची बैठक.

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस असून, त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे आणि मुंबईत येऊन आंदोलन करण्याच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची राजकीय व प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे खडबडून जागी झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय ‘वर्षा’ निवास स्थानी मध्यरात्री एक अतिशय महत्त्वाची आणि गुप्त उच्चस्तरीय बैठक पार पडली. रात्री उशिरा पर्यंत चाललेली ही खलबते तब्बल रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती, ज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर आणि सरकार पुढील पर्यायांवर सविस्तर खल करण्यात आला.

       जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर मार्ग काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मध्यरात्रीच्या बैठकीला महायुतीमधील अनेक प्रमुख व दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते प्रसाद लाड प्रामुख्याने सहभागी झाले होते. मराठा समाजाला हक्क व न्याय मिळवून देतानाच ओबीसी समाजावर किंवा इतर घटकांवर कोणताही अन्याय होणार नाही, या अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीर मुद्द्यावर या बैठकीत गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या उच्चस्तरीय बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले, याबाबत अद्याप शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

        सलग अकरा दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांचे शरीर अत्यंत अशक्त झाले असून त्यांचे वजन झपाट्याने घटले आहे. त्यांच्या रक्तातील साखर आणि रक्तदाब (बीपी) चिंतेत भर घालणाऱ्या पातळीपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मध्यरात्री अडीच वाजता त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे समजताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी तातडीने त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. सकाळपासूनच आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस कार्यवाही सुरू केली जाईल, असा शब्द देत त्यांनी उपोषणा दरम्यान वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन केले. या आश्वासनानंतर जरांगे यांनी वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून सलाईन घेणे मान्य केले, परंतु आपल्या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी आपली ठाम भूमिका कायम ठेवल्यामुळे सरकार समोरील अडचणी अद्याप कायम आहेत.

       मनोज जरांगे यांच्या खालावलेल्या प्रकृतीच्या वृत्तामुळे राज्यभरातील मराठा आंदोलक तीव्र संतापले असून, रात्री उशिरा धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरत टायर जाळण्याच्या घटना घडल्यामुळे अनेक भागांत तणावाचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर, आज नाशिक येथे मराठा संघटनांची एक अत्यंत महत्त्वाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून, ज्यांच्या कुणबी नोंदी अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यांना एसईबीसी (SEBC) प्रवर्गातूनच आरक्षण मिळायला हवे, या मागणीवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी या राज्यस्तरीय बैठकीत कोणते कठोर निर्णय घेतले जातात, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आगामी काळात आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पेपरफुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; टास्क फोर्सवर सवाल

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software