- Hindi News
- पुणे
- पुण्यात पोलिस शिपायावर चाकू हल्ला; रेल्वे ट्रॅकवरील गांजा प्रकरणाने खळबळ
पुण्यात पोलिस शिपायावर चाकू हल्ला; रेल्वे ट्रॅकवरील गांजा प्रकरणाने खळबळ
पुण्यात रेल्वे ट्रॅकवर गस्त घालणाऱ्या पोलीस शिपायावर नशेड्यांचा चाकू हल्ला. वानवडीत अल्पवयीन मुलांच्या मदतीने गांजा विकणाऱ्या टोळीकडून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे ट्रॅकवर गस्त घालणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर गांजा पिणाऱ्या काही समाज कंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत हादरवणारी घटना समोर आली आहे. रेल्वे ट्रॅकवर उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याला हटकल्याच्या राग मनात धरून आरोपींनी पोलीस शिपायाच्या गळ्यावर धारदार चाकुने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय बांबल असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या थरारक घटनेमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशन आणि संपूर्ण रेल्वे ट्रॅक परिसरातील प्रवाशांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेली माहिती नुसार, पोलीस शिपाई अक्षय बांबल हे नेहमी प्रमाणे रेल्वे ट्रॅक परिसरावरून जात असताना त्यांना काही तरुण संशयास्पद स्थितीत गांजा पिताना आढळले. कर्तव्यदक्षता दाखवत त्यांनी तात्काळ त्या टोळक्याला हटकले आणि जाब विचारला. याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून त्या नशेड्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये आरोपींनी थेट धारदार चाकूचा वापर करत त्यांच्यावर वार केले, ज्यामध्ये बांबल यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिपायाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सणासुदीच्या आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलिसांवरच असा थेट जीवघेणा हल्ला झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकां मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुसऱ्या एका कारवाई मध्ये, शहरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. वानवडी पोलिसांनी हडपसर परिसरातील सुरक्षानगर भागात केलेल्या एका धडक कारवाईत विधिसंघर्षित बालकांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने तब्बल ११ लाख ४४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये गांजा, एक मोपेड गाडी, मोबाईल फोन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे आणि गुन्हेगारांच्या मुजोरपणामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले असून, यावर पोलीस प्रशासना कडून अधिक कठोर आणि धडक पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
