- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पुण्यात दहीहंडीतील नियमभंग; आयोजकांसह साऊंड मालकांवर गुन्हे
पुण्यात दहीहंडीतील नियमभंग; आयोजकांसह साऊंड मालकांवर गुन्हे
पुण्यात दहीहंडी उत्सवात बंदी असलेल्या 'प्रेशर मिड' आणि 'डॉल्बी' साऊंड सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी फरासखाना व कोथरुड पोलिसांत गुन्हे दाखल. साऊंड साहित्य जप्त.
पुणे: पुणे पोलीस आयुक्तालया कडून ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात कठोर पावले उचलली जात आहेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘प्रेशर मिड’ आणि ‘डॉल्बी’ साऊंड सिस्टीमच्या वापरावर सक्त मनाई केली असतानाही, आदेशांना न जुमानता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश पेठ व कोथरुड मधील आयोजक, साऊंड मालक आणि चालकांवर पोलिसांनी दंडात्मक व फौजदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचे साऊंड साहित्य जप्त केले असून, सण-उत्सवांच्या काळात नियम मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे आयोजित दहीहंडी उत्सवा दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या स्पष्ट आदेशा नुसार शहरात प्रेशर मिड साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई आहे. मात्र, पांगुळआळी दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष विजय सुरेश सुतार (वय ४०, रा. पांगुळ आळी, गणेश पेठ) आणि रिच ऑडिओ सिस्टीमचे मालक नरसिंह राम रेड्डी (वय ३२, रा. नवी सांगवी) यांनी नियमांचे उल्लंघन करत प्रत्येक साऊंड मध्ये तब्बल सहा प्रेशर मिडचा वापर केल्याचे उघडकीस आले. दहीहंडीच्या दिवशी दुपारी पोलीस पथक परिसरात गस्त घाजत असताना हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी साऊंडची प्रत्यक्ष पाहणी करून एक टॉप उघडून तपासला असता, आवाजाची तीव्रता कृत्रिम रीत्या मोठ्या प्रमाणावर वाढविणारे गोलाकार प्रेशर मिड आढळून आले. परवानगी नसतानाही या धोकादायक साऊंड सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये मूल्याचे चार टॉप साऊंड जप्त केले असून, समितीचे अध्यक्ष आणि साऊंड मालका विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत कोथरुड पोलिसांनीही डेसिबलची मर्यादा ओलांडून ध्वनि प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारला आहे. कोथरुड मधील शिवतीर्थ नगर येथील सार्वजनिक रस्त्यावर दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना ‘अखिल बंजारा समाज मंडळ’च्या वतीने ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात आला. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष राहुल किसन कटरावत (वय ३२, रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साऊंड किंवा स्पिकर चालक चिरंजीवी भिंगरे (रा. कालीदास ऑडिओ, रायगड) यांच्या विरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक वटपलवाड या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहरात गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने सर्व गणेश मंडळ व साऊंड चालकांसाठी स्पष्ट नियमावली जारी केली आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही काही मंडळांकडून नियमांची पायमल्ली सुरूच असल्याचे या घटनांवरून दिसून येते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि प्रशासकीय आदेशांना डावलणाऱ्या अशा सर्व घटकांवर आता पोलीस आयुक्तालया कडून संपूर्ण उत्सव काळात कडक नजर ठेवली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
