- Hindi News
- पुणे
- पुण्यात भरदिवसा तीन फ्लॅट फोडणारी टोळी जेरबंद; मुंबईतून एकाला अटक
पुण्यात भरदिवसा तीन फ्लॅट फोडणारी टोळी जेरबंद; मुंबईतून एकाला अटक
पुण्यात कात्रजमध्ये ३ फ्लॅट फोडणाऱ्या टोळीचा दरोडा विरोधी पथकाकडून पर्दाफाश. मुंबईतून फकरुद्दीन शाहला अटक, रायगड-नाशिकमधील गुन्हे उघड.
पुणे: पुण्यातील कात्रज परिसरातील मांगडेवाडी भागात एकाच गृहप्रकल्पातील तीन फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या कुख्यात घरफोड्या टोळीचा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईतून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने पुणे जिल्ह्या शिवाय रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक परिसरातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. फकरुद्दीन इमामुद्दीन शाह (वय ३९, रा. घाटकोपर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याचे इतर साथीदार सध्या फरार आहेत.
याबाबत सराफ व्यावसायिक प्रविण प्रताप सावंत (वय ३७, रा. ओम रेसिडेन्सी, मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कात्रजमधील मांगडेवाडी येथील ओम रेसिडेन्सी व शेजारील शिवालय सोसायटी मध्ये ही थरारक घटना घडली होती. फिर्यादी प्रविण सावंत यांचे वेदिका ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान असून, घटनेच्या दिवशी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आतील कपाटातून सोन्याची साखळी, टॉप्स, कानातील रिंगा, लॉकेट आणि चांदीचे पैंजण असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारील शिवालय सोसायटीतील आणखी दोन घरे देखील याच वेळी फोडण्यात आली असून, त्या दोन्ही फ्लॅट्समधून सव्वापाच लाखांहून अधिकचा मुद्देमाल लांबविण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास पुणे पोलिसांच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाकडून सुरू होता. तपासा दरम्यान पोलीस अंमलदार रवींद्र लोखंडे आणि प्रदीप राठोड यांनी घटना स्थळासह आजूबाजूच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज कसून तपासले. या तांत्रिक तपासात चार चोरटे एका सिल्व्हर रंगाच्या वॅग्नर कारमधून येऊन अत्यंत नियोजन बद्ध पद्धतीने घरफोडी करून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व पोलीस अंमलदार अजित शिंदे यांना मिळालेल्या खबऱ्यामार्फत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार मुंबईत असल्याची पक्की माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ मुंबईला रवाना झाले आणि घाटकोपर येथील त्याच्या राहत्या घरातून फकरुद्दीन शाह याला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत फकरुद्दीन शाह याने आपल्या इतर साथीदारांच्या सोबतीने मांगडेवाडीतील ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. चौकशी दरम्यान त्याने केवळ पुण्यातच नव्हे, तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिसरा मध्ये देखील अशाच प्रकारे अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. या रॅकेट मधील त्याचे इतर साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, प्रदीप राठोड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर आणि साधना पवार यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली असून, या सराईत गुन्हेगाराच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
