- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- एसटी बँकेतील २३.९७ कोटींच्या निविदा फाईल्स गायब; पुरावे नष्ट केल्याचा आरोप
एसटी बँकेतील २३.९७ कोटींच्या निविदा फाईल्स गायब; पुरावे नष्ट केल्याचा आरोप
एसटी बँकेतील २३.९७ कोटी रुपयांच्या फर्निचर दुरुस्ती निविदा फाईल्स गायब. पुरावे नष्ट केल्याचा आरोप करत श्रीरंग बरगे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) केली तक्रार.
मुंबई: सुमारे ६३ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे सभासदत्व असलेल्या ‘स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक’ (एसटी बँक) मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यात येत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप समोर आला आहे. बँकेच्या विविध शाखांमधील अंतर्गत सजावट आणि फर्निचर दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेशी संबंधित तब्बल २३ कोटी ९७ लाख रुपयांच्या कामांच्या तीन महत्त्वाच्या फाईल्स रहस्यमयी रीतीने गहाळ झाल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) धाव घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची आर्थिक वाहिनी मानली जाणारी ही बँक गेल्या काही काळापासून संचालक मंडळातील अंतर्गत वाद, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध मुद्यांमुळे सातत्याने चर्चेत राहिली आहे. ताज्या प्रकरणानुसार, बँकेच्या एकूण ४० शाखांमध्ये अंतर्गत सजावट आणि फर्निचर दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया (निविदा क्रमांक १३/२५-२६) राबवण्यात आली होती. या प्रक्रिये अंतर्गत तीन मोठ्या कामांशी संबंधित फाईल्स तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील एका फाईल मधील काही महत्त्वाची कागदपत्रे गायब झाली असून, उर्वरित दोन फाईल्स पूर्णपणेच गहाळ झाल्याचा खळबजनक दावा श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
या संबंधित तीन कामांचे करार मूल्य अत्यंत मोठे असून, अनुक्रमे १६ कोटी ७० लाख ८८ हजार रुपये, ३ कोटी ३४ लाख १७ हजार ६८५ रुपये आणि ३ कोटी ९१ लाख ७६ हजार रुपये एवढे होते. या तीनही कामांची एकत्रित किंमत जवळपास २३ कोटी ९६ लाख ८१ हजार ६८५ रुपये (सुमारे २३.९७ कोटी रुपये) इतकी భారీ आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीशी संबंधित निविदा फाईल्स अचानक गायब होणे ही केवळ प्रशासकीय निष्काळजी पणाची बाब असू शकत नाही, असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आला आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार लपवण्यासाठी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी श्रीरंग बरगे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस आयुक्तांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. गहाळ झालेल्या या फाईल्स नेमक्या कुणाच्या ताब्यात होत्या, त्यातील कागदपत्रे कधी आणि कोणत्या परिस्थितीत गायब झाली, तसेच या निविदा प्रक्रियेत प्रत्यक्ष आर्थिक घोटाळा झाला आहे का, या सर्व बाजूंची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तपासात जर गैरव्यवहार किंवा पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधित दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे एसटी बँक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यंत्रणांकडून यावर काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे.
