- Hindi News
- सातारा
- फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
जमिनीच्या अपिलासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या खासगी एजंटाला सातारा एसीबीने फलटणमध्ये रंगेहात पकडले.
फलटण: जमिनीच्या फेरफार प्रकरणातील विलंबमाफीचा अर्ज मंजूर करून अपिलाचा निकाल बाजूने लावून देण्याच्या मोबदल्यात प्रांताधिकाऱ्यांच्या नावाखाली ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. फलटण मधील गिरवी चौकातील लॉ कॉलेजसमोर हा सापळा रचण्यात आला होता. विकास शंकर तोडकर (वय ३६, रा. नांदल, ता. फलटण) असे लाच घेताना जाळ्यात अडकलेल्या खासगी एजंटाचे नाव असून, याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या टाकळवाडे (ता. फलटण) येथील वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काबाबत हा वाद सुरू होता. सहहिस्सेदाराची परवानगी न घेता जमीन परस्पर विकल्याचे समोर आल्यानंतर तक्रारदाराने हा फेरफार रद्द करण्यासाठी २४ जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते. सदर प्रकरणात अपील दाखल करण्यास ६० दिवसांची मुदत उलटून गेल्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात विलंबमाफीचा अर्ज देण्यात आला होता. या अर्जावर अनुकूल निर्णय घेण्यासाठी व पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार गेले असता, मध्यस्थी करणाऱ्या विकास तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांच्या नावाखाली ५० हजार रुपये आणि स्वतःसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने २५ ऑगस्ट रोजी सातारा एसीबी कार्यालयात धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष या प्रकरणाची सखोल पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान तोडकर याने प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी ठरलेल्या नियोजना नुसार गिरवी चौकातील लॉ कॉलेज समोर सापळा रचण्यात आला. या कारवाई दरम्यान विकास तोडकर याला तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोकड स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईत हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, गणेश ताटे, महिला पोलीस प्रियांका जाधव व अजित कर्णे यांनी सहभाग घेतला. शासकीय कार्यालयांमध्ये वावरत सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या खासगी एजंटांवर एसीबीने केलेल्या या धडक कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
