पुणे मनपा कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत हायटेक कॉपी; छुप्या कॅमेऱ्यासह तिघे जाळ्यात

पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत चष्म्यात लपवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हायटेक कॉपी. ३ उमेदवार व TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल.

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदाच्या भरती परीक्षेत अत्यंत हायटेक आणि आधुनिक पद्धतीने गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षेत चष्म्यात लपवून ठेवलेल्या गुप्त कॅमेऱ्याच्या मदतीने कॉपी करणाऱ्या तिन्ही उमेदवारांचे नोकरी मिळण्याचे स्वप्न अवघ्या काही वेळातच धुळीस मिळाले असून, पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर आणि त्यांना मदत करणाऱ्या टीसीएस (TCS) कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांसह एकूण पाच ते सहा जणांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे शासकीय नोकर भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

       पुणे महानगरपालिकेने एप्रिल महिन्यात कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण १६९ जागांसाठी राज्यभरात परीक्षा आयोजित केली होती. मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी तब्बल २२ हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. छत्रपती संभाजीनगर येथील एका परीक्षा केंद्रावर झालेल्या या संपूर्ण गैरप्रकाराची पोलखोल झाली आहे. गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे आणि विष्णुकांत वाघमारे अशी कॉपी करणाऱ्या तिन्ही आरोपी उमेदवारांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षे दरम्यान चष्म्यात अत्यंत चलाखीने छुपा कॅमेरा बसवून बाहेरील व्यक्तींच्या मदतीने प्रश्नपत्रिका बाहेर पाठवली आणि हायटेक पद्धतीने कॉपी केली. विशेष म्हणजे, या तिन्ही उमेदवारांना परीक्षेत ९० पेक्षा जास्त गुण मिळाल्यामुळे त्यांची कनिष्ठ अभियंता पदावर थेट निवडही झाली होती.

      या संपूर्ण हायटेक गैरप्रकारात केवळ विद्यार्थीच नव्हे, तर परीक्षा घेणाऱ्या प्रतिष्ठित ‘टीसीस’ (TCS) कंपनीचे कर्मचारीही सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टीसीएसचे कर्मचारी योगेश राठोड आणि विकास गायकवाड यांनी या विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपी करण्यासाठी प्रत्यक्ष रित्या मदत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी याआधीच सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस प्रशासनाकडून या रॅकेटचे जाळे कुठेकुठे पसरले आहे, याचा सखोल शोध घेतला जात आहे.

      दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि मनपा प्रशासनावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. पुणे मनपाच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्टपणे सिद्ध झाले असतानाही, सखोल चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्या संशयित उमेदवारांना नियुक्त्या देण्यासाठी इतकी घाई का करत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रामाणिकपणे दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या हक्कावर असा गैरप्रकार करून डल्ला मारणारे रॅकेट सक्रिय असणे अत्यंत संतापजनक असून, यामागे नेमका कुणाचा दबाव आहे, असा संतप्त सवाल विचारत त्यांनी प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा

Latest News

सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना दिलासा; कायद्यातील बदलांसाठी वर्षभराची मुभा
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील दंडात्मक कारवाईला १ वर्षाची स्थगिती. नियमांनुसार बदलांसाठी एफडीए व व्यापाऱ्यांची संयुक्त समिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय....
फलटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने ५० हजारांची लाच; खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
खंडाळा गांजा प्रकरणाचा ३८ वर्षांचा वनवास; निवृत्त पोलिसांची न्यायासाठी लढाई सुरूच
म्हाडाची नवी योजना; विक्री न झालेली शेकडो घरे आता भाड्याने देणार
फोटो हटवण्यावरून राजकीय संघर्ष; कृष्णराज महाडिकांचा अमित ठाकरेंवर संताप

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software