- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अमरावती स्त्री रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग उभारणार; बावनकुळेंची घोषणा
अमरावती स्त्री रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग उभारणार; बावनकुळेंची घोषणा
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर 'एम्स'च्या धर्तीवर नवीन सुसज्ज ICU उभारणार. पीडित कुटुंबांना ५ लाखांची मदत वितरीत.
अमरावती: जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडलेली आगीची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून, या दुर्दैवी घटनेत ३ बालकांचा मृत्यू झाला आहे. गरजूंसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विभागाची आता ‘एम्स’च्या (AIIMS) मानकानुसार जागतिक दर्जाच्या उपकरणांनिशी अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
अमरावती दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मुरके हॉस्पिटल) तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीत नवजात शिशूंचे प्राण वाचवणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता होती, ज्या अंतर्गत ३६ बालकांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यामुळे या सर्व बालकांची प्रकृती आता उत्तम असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी घटनेच्या दिवशीच भेट दिली असून, आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. मागील दोन वर्षांत जिल्हा स्त्री रुग्णालयाला आवश्यकते नुसार पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यावर्षी रुग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नाही. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या अत्यंत कठीण प्रसंगात शासनाकडून पीडित कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीपैकी प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे आणि गंगाराम बेठेकर या दुर्दैवी पालकांना धनादेश सुपूर्द करण्यात आले. तसेच, संकटकाळात खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेऊन शिशूंवर पूर्णपणे मोफत उपचार केल्याबद्दल त्यांनी रुग्णालयांचे विशेष आभार मानले.
