- Hindi News
- सातारा
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांची महत्त्वाची बैठक; नियम पालनाचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांची महत्त्वाची बैठक; नियम पालनाचे आवाहन
सातारा तालुका पोलिसांतर्फे ५०० गणेश मंडळांची संयुक्त मार्गदर्शन बैठक. शांततेत उत्सव साजरा करण्यासाठी कडक नियमावली आणि 'डॉल्बी बंदी'चे आवाहन.
सातारा: आगामी गणेशोत्सव २०२६ अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची एक संयुक्त मार्गदर्शन बैठक नुकतीच पार पडली. राधिका रोडवरील कदम पेट्रोल पंपा समोरील मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या या बैठकीस सुमारे ४७५ ते ५०० गणेश मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेत सुसंवाद साधण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीला एम.एस.ई.बी. ग्रामीण विभागाचे उपअभियंता विवेक पाटील, नायब तहसीलदार वैभव कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आंबेकर, धर्मादाय कार्यालयाचे निरीक्षक सुनील माने, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील आणि कारकून तुषार पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून उपस्थितांना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या अधिकृत परवानग्या, आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही कडक व स्पष्ट सूचना दिल्या. सर्व मंडळांनी वेळेत अधिकृत नोंदणी व परवानग्या पूर्ण करून घ्याव्यात आणि मंडप उभारणी करताना रस्ता किंवा रहदारीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसर व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्वयंसेवकांची नावे, फोटो व मोबाईल नंबर दर्शनी भागात लावणे आणि कार्यकर्त्यांनी अधिकृत बॅज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्युत सुरक्षेबाबत बोलताना विद्युत वायरिंग केवळ अधिकृत तंत्रज्ञाकडूनच करून घ्यावी, डीजी सेट व इंधन साठा सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि मंडपात अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश देण्यात आले. ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाने ठरवून दिलेल्या निश्चित मर्यादा आणि वेळेतच करावा, असा नियम पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आला. देखाव्यांचे स्वरूप केवळ सामाजिक प्रबोधन करणारे असावे, तर कोणत्याही प्रकारच्या अश्लील, आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारे फलक, गाणी व कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.
गर्दी आणि विसर्जन मिरवणुकीच्या व्यवस्थापनासाठी दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा कराव्यात तसेच पोलिसांकडून ठरवून दिलेल्या विसर्जन मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच, प्रत्येक गावात किमान १० ते १५ तरुणांचे 'ग्रामसुरक्षा दल' स्थापन करून त्यांना रात्रीच्या गस्तीसाठी टी-शर्ट, शिट्टी, लाठी व बॅटरी उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना देण्यात आली. विशेष म्हणजे, सर्व सरपंच व उपसरपंचांनी आपापल्या ग्रामपंचायती मध्ये 'डॉल्बी बंदीचा ठराव' पास करून घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने सर्वांनी ‘शांतता, शिस्त व सुरक्षितता’ या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी बैठकीच्या शेवटी केले.
