- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महिला आरक्षणाच्या ८५० जागांवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
महिला आरक्षणाच्या ८५० जागांवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
खासदार संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल. महिला आरक्षणाच्या ८५० जागांवरून सवाल करत नेत्यांच्या लांबच लांब भाषणांवर ओढले ताशेरे.
मुंबई: महिला आरक्षणावरून आणि 'CJP' (काँग्रेस जिताओ पार्टी) च्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. आधीच संमत असलेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या अनुषंगाने आताच अचानक ८५० जागा कशा निर्माण झाल्या, असा सवाल करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या लांबच लांब भाषणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आणि त्यांना थेट 'भाषण माफिया' अशी उपमा दिली.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि वक्तव्यांवर कडाडून टीका केली. महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, "आता ८५० जागा अचानक कशा उपटल्या? तेव्हा कुणी या जागांचा उल्लेख केला नव्हता," असा संतप्त सवाल केला. वारंवार तेच विषय चघळण्याऐवजी शासनाने आधी ठरलेले विधेयक प्रत्यक्षात लागू करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आजची तरुण पिढी (Gen Z) या सर्व प्रकारांना कंटाळली असून ती आता पेटून उठली आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या बैठका आणि सभांमधील दृश्यांवर उपरोधिक टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या व्यासपीठावर त्यांचेच आमदार आणि नेते झोपले होते, काही जण जांभया देत होते तर काही जण डुलक्या काढत होते, असा दावा करत त्यांनी सत्तेवर असलेल्या लोकांनी तासन्तास भाषणे करण्याची ही 'भाषण माफियागिरी' राज्याच्या हिताची नाही, असे म्हटले. तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार आहे, परंतु ही भाषणबाजी आता लोकांना नकोशी झाली आहे, असा टोमणा त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 'सीजेपी' (काँग्रेस जिताओ पार्टी) च्या उल्लेखावरूनही राऊतांनी जोरदार प्रतिवार केला. जर CJP ही काँग्रेस जिताओ पार्टी असेल, तर मग रात्री-अपरात्री सोशल मीडियावर व्हिडिओ करून आणि रील्स बनवून पंतप्रधानांनी त्याच पक्षाला का चुचकारले, असा सवाल त्यांनी केला. राजकारणात नेत्यांनी हवे ते आणि तोंडाला येईल ते बोलण्यापेक्षा अत्यंत काळजीपूर्वक व जबाबदारीने वक्तव्ये करावीत, असा सल्लाही संजय राऊतांनी यावेळी दिला.
