- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपणारी ‘शाहू सृष्टी’ कागलमध्ये
राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा जपणारी ‘शाहू सृष्टी’ कागलमध्ये
कोल्हापूरच्या कागलमध्ये २० एकर जागेवर जागतिक दर्जाची 'शाहू सृष्टी' उभारणार. हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार.
मुंबई: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीला आणि त्यांच्या पुरोगामी सामाजिक सुधारणांच्या कार्याला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे एका भव्य प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. कागल येथे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार असून, याद्वारे इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर थ्रीडी आराखडा सादर करण्यात आला.
मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संयुक्त संकल्पनेतून हा प्रकल्प आकार घेणार आहे. कागल नगरपालिका आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली असून, आगामी तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या बैठकीला कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाचे सादरीकरण आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी केले. आगामी काळात या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या समोरही केले जाणार आहे.
या प्रस्तावित ‘शाहू सृष्टी’मध्ये पर्यटकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याची आणि दूरदृष्टीपूर्ण विचारांची प्रचिती देणाऱ्या अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. संग्रहालया परिसरात महाराणी लक्ष्मीबाई जलाशय (राधानगरी धरण) आणि ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या जाणार असून, परिसराचे मुख्य आकर्षण म्हणून शाहू महाराजांचा एक भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या जन्मस्थानाशी व जीवन प्रवासाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या हुबेहूब प्रतिकृती येथे पाहायला मिळतील. आधुनिक प्रदर्शन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा आणि लोककल्याण या क्षेत्रातील अमूल्य योगदान डिजिटल माध्यमातून मांडले जाणार आहे.
हा प्रकल्प केवळ मनोरंजनाचे केंद्र न राहता एक शैक्षणिक आणि सर्व समावेशक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जात आहे. पर्यटकांसाठी झिपलाइन, रोप-कोर्स यांसारख्या साहसी उपक्रमांसाठी अडव्हेंचर पार्क, तसेच निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांच्या निवासासाठी कॉटेज व डॉर्मिटरीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला व स्मृतिचिन्हांच्या विक्रीसाठी विशेष दालने असणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुला रंगमंच आणि शाहू महाराजांच्या विचारांचे अध्ययन, संशोधन व समाज जागृती करण्यासाठी एक स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र तसेच बहुउद्देशीय सभागृह या परिसरात उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे कागलच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असून, शाहू महाराजांचा समतावादी आणि विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
