- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा मोठा निकाल
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास ५ वर्षे सश्रम कारावास; सत्र न्यायालयाचा मोठा निकाल
मुंबई: मुंबईतील चेंबूर परिसरातील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंग आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सत्र न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी फुलदेव रामप्रीत पासवान याला दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ८,००० रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
२०१९ मध्ये आरसीएफ पोलीस ठाण्यात आरोपी फुलदेव पासवान याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ४५२ आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) कलम १० नुसार गुन्हा (गु.र.क्र. ८१/२०१९) दाखल करण्यात आला होता. आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.
न्यायालयाचा निकाल
या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात सबळ पुरावे सादर केले होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास, ८,००० रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
हा खटला यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने विशेष मेहनत घेतली. यामध्ये अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांचा समावेश होता.तसेच, या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई (सध्या गावदेवी पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक गजानन देशमुख, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपाली पावसे आणि त्यांच्या पथकाने न्यायालयात भक्कम पुरावे मांडल्यामुळे आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.या निकालामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
