- Hindi News
- सातारा
- विश्वकर्मा सुपरमार्ट गुंतवणूकदारांनो सावधान! फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरावे सादर करण्याच...
विश्वकर्मा सुपरमार्ट गुंतवणूकदारांनो सावधान! फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरावे सादर करण्याचे आवाहन
सातारा: जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा येथील 'विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस' आणि 'विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि.' या कंपन्यांच्या संचालकांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
विश्वकर्मा सुपरमार्टच्या कोडोली (सातारा) आणि इतर शाखांमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक १३.५ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, या परताव्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र ठेवदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत, त्यांनी आपली तक्रार आणि पुरावे नोंदवण्यासाठी खालील कालावधीत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तारीख: ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत
ठिकाण: आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.
सोबत आणायची आवश्यक कागदपत्रे:
गुंतवणूकदारांनी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन छायांकित (झेरॉक्स) प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे:
१. गुंतवणुकीचा पुरावा (मूळ ठेव पावती, प्रमाणपत्र).
२. ज्या बँक खात्यातून व्यवहार झाला, त्या खात्याचे स्टेटमेंट.
३. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट छायांकित प्रत.
४. आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
५. जर काही परतावा (व्याज/मुद्दल) मिळाला असेल, तर त्याचे पुरावे किंवा बँक स्टेटमेंट.
६. बँक खात्याचे जे वारसदार असतील, त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
ज्या गुंतवणूकदारांनी दहीवडी पोलीस ठाणे (सातारा) किंवा वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे (पुणे) येथे आधीच तक्रार नोंदवून आपले जबाब दिले आहेत, त्यांना साताऱ्यातील कार्यालयात पुन्हा हजर राहण्याची आवश्यकता नाही.गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी संबंधित सर्वांनी विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
