- Hindi News
- सातारा
- दहिवडीच्या विद्यार्थ्यांची शाहिरी पोवाड्यात 'धुरंधर' कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले यश!
दहिवडीच्या विद्यार्थ्यांची शाहिरी पोवाड्यात 'धुरंधर' कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावले यश!
दहिवडी: सातारा जिल्हा परिषद आयोजित 'विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२५-२६' अंतर्गत झालेल्या शाहिरी पोवाडा स्पर्धेत दहिवडीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू कलेचे सादरीकरण करत यशाचा झेंडा रोवला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ व ३ च्या विद्यार्थ्यांनी लहान गटात प्रथम, तर मोठ्या गटात तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. लहान गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ व ३ च्या संघाने आपल्या गुणवत्तेचे सातत्य टिकवून ठेवत सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. मुख्य शाहिर अर्णव सागर जाधव याच्या पहाडी आवाजातील सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. त्याला मोहसिन शेख, सिद्धी क्षीरसागर, सिद्धार्थ मिराशी, वेदांत गायकवाड, स्वराली साठे, संस्कृती मतकर आणि स्वरा हिंगळकर या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट साथ दिली.मोठ्या गटामध्ये दहिवडी शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात तृतीय क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्य शाहिर साहिल दादा दडस याने अत्यंत जोशपूर्ण पोवाडा सादर केला. त्याला सोहम भोसले, पार्थ सकट, रुद्र पवार, राजवीर वायदंडे, विश्वभूषण वाघमारे, स्वराज जाधव व यश शिंदे या विद्यार्थ्यांनी समर्थ साथ लाभली.
या यशासाठी मुख्याध्यापक विजय खरात व महादेव महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली केशर माने, सुनीता यादव, मनीषा बोराटे, राजेंद्र खरात, सागर जाधव, रेखा मोहिते, नम्रता चव्हाण, माया तंतरपाळे आणि आशा जाधव या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
"दहिवडीच्या विद्यार्थ्यांनी लोककला आणि शाहिरी परंपरा जपण्यासाठी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश साध्य झाले आहे." विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीम तांबोळी, विजय गंबरे, केंद्रप्रमुख शोभा पवार तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतापगडावर होणार सादरीकरण :
या यशाची मोठी पावती म्हणून, येत्या १९ फेब्रुवारी रोजी किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या शासकीय शिवजयंती कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना पोवाडा सादरीकरणाची संधी मिळणार आहे. याच दिमाखदार सोहळ्यात त्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात येईल.
