- Hindi News
- सातारा
- सातारा पोलिसांची मोठी कारवाई; पिकअप आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा पोलिसांची मोठी कारवाई; पिकअप आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा: नवीन चारचाकी वाहनांची डिलिव्हरी करणाऱ्या चालकांना लक्ष्य करून त्यांची वाहने चोरणाऱ्या एका सराईत टोळीला जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २२ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, चोरीचे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आगामी सण, उत्सव आणि वर्षअखेरीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर परिसरात कडक गस्त घालण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्या होत्या. दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सातारा शहर डी.बी. पथक गस्तीवर असताना, एम.आय.डी.सी. परिसरात काही तरुण चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धनगरवाडी ते बिरोबा मंदिर रस्त्यावर सापळा रचला. रात्री ८ च्या सुमारास एक विनाक्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने वाहन जोरात पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी स्वतःचे वाहन आडवे लावून त्याला रोखले. यावेळी अंधाराचा फायदा घेत चालक उसाच्या शेतात पळून गेला, पण तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला अतित (ता. सातारा) येथून ताब्यात घेतले.
चोरीचा मास्टरप्लॅन उघड
ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी कुळकजाई (ता. माण) येथून एका नवीन चारचाकी वाहनाची डिलिव्हरी करणाऱ्या चालकाचे वाहन चोरले होते आणि ते विक्री करण्यासाठी साताऱ्यात आणले होते. याशिवाय त्यांनी चाकण (पुणे) येथून आणखी एक पिकअप चोरल्याची कबुली दिली. तपासादरम्यान दहिवडी आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेले २ बोलेरो पिकअप, सातारा शहर परिसरातून चोरलेल्या २ मोटारसायकल , बॉम्बे रेस्टॉरंट ब्रीजखाली झोपलेल्या परप्रांतीय तरुणाचा मोबाईल आणि २९ साड्या असे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी प्रणव अरुण पवार (वय ३२, रा. किन्हई, ता. कोरेगाव), चंद्रकांत विठ्ठल जाधव (वय २८, रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दोन पिकअप, दोन मोटारसायकल, मोबाईल आणि साड्या असा एकूण २२,८२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
