- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राज्यात रोजगाराची मोठी संधी; २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’
राज्यात रोजगाराची मोठी संधी; २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’
महाराष्ट्र शासनाचा २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात 'रोजगार महाकुंभ'. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे तरुणांना क्यूआर कोडद्वारे त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन.
रत्नागिरी: राज्यातील तरुण-तरुणींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अवगत कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक आणि दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात भव्य ‘रोजगार महाकुंभ’आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. या महाकुंभामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रशासनाकडून उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
या रोजगार महाकुंभा मध्ये नामांकित उद्योग समूह, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), मोठी व्यापारी आस्थापने तसेच सेवा क्षेत्रातील प्रमुख रोजगार दात्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. विविध कंपन्यां मधील रिक्त पदांची संख्या, पदनिहाय आवश्यक पात्रता आणि कौशल्यांची अचूक निश्चिती करून अधिकाधिक उद्योगांना या व्यासपीठावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, आयटीआय, विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये, विद्यापीठे आणि जिल्हा रोजगार कार्यालयांच्या माध्यमातून या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली जात आहे. विशेषतः महिला, दिव्यांग, ग्रामीण भागातील तरुण आणि अल्प उत्पन्न गटातील उमेदवारांचा सहभाग वाढवण्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असणार आहे, जेणेकरून सर्व समावेशक विकासाचा उद्देश साध्य होईल.
केवळ मेळावा भरवून न थांबता, उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आणि कॉर्पोरेट जगताच्या व्यावसायिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने मेळाव्यापूर्वी विशेष ‘जॉब रेडीनेस’ पूर्वतयारी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, आकर्षक रेझ्युमे लेखन, मुलाखत देण्याची कला तसेच उद्योगांच्या तात्कालिक गरजेनुसार अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण व ओरिएंटेशनचा समावेश असणार आहे, ज्यामुळे युवकांचा आत्मविश्वास उंचावण्यास मोठी मदत होईल.
हा संपूर्ण भरती मेळावा अत्यंत पारदर्शक आणि सुटसुटीत पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मेळावास्थळी प्राथमिक नोंदणी, समुपदेशन, कागदपत्र पडताळणी, प्रत्यक्ष मुलाखती, अंतिम निवड प्रक्रिया आणि निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर वितरीत करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष कामावर रुजू होण्या बाबत (जॉइनिंग) नियमित पाठपुरावा (Follow-up) ठेवण्यासाठी एक विशेष यंत्रणा देखील कार्यरत राहणार आहे. राज्यातील युवकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून त्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
