दुकान हडपण्यासाठी बनावट समझोता करार; प्रकरण उघड होताच गुन्हा दाखल

पुण्यात दुकान बळकावण्यासाठी बनावट समझोता करार करणाऱ्या ५ जणांवर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल. RTI द्वारे उघडकीस आला बनाव.

पुणे: कायदेशीर आणि सर्व नियम पाळून खरेदी केलेल्या दुकानावर मालकी हक्क सांगण्यासाठी आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने बनावट समझोता करार तयार करून पोलिसांकडे खोटा तक्रार अर्ज दाखल केल्याचा गंभीर प्रकार पुणे शहरातील हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी खोटा खटाटोप करणाऱ्या चार प्रमुख व्यक्तींसह बनावट सही करणाऱ्या आणि जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर उपलब्ध करून देणाऱ्या स्टॅम्प व्हेंडर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून एका जागरूक ज्येष्ठ नागरिकाने हा संपूर्ण बनाव उघडकीस आणल्यामुळे पुणे पोलिस व महसूल वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

       याप्रकरणी राजेंद्र केशवराव मोकाशी (वय ५९, रा. ललिता महाल सोसायटी, बाणेर रोड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादी नुसार पोलिसांनी केदार माधव बिडवाई, गजानन बिडवाई, तुषार सुदाम पायगुडे, विनोद रमेश कुलकर्णी तसेच बनावट सही करणारे आणि जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर देणारे स्टॅम्प व्हेंडर यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. हा संपूर्ण प्रकार २५ मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत शिवनेरी कामधेनु इस्टेट, हडपसर येथे घडल्याचे समोर आले आहे. पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी राजेंद्र मोकाशी यांचा मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी याच्या नावे २५ मे २०२२ रोजी शिवनेरी कामधेनु इस्टेट येथील अंदाजे २३५ चौरस फूट क्षेत्रफळाचे एक दुकान कायदेशीररीत्या १८ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते. हे दुकान खरेदी करताना वृत्तपत्रात नोटीस देऊन आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच हा व्यवहार पार पाडला होता.

         मात्र, व्यवहार झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी, म्हणजेच मे २०२५ मध्ये केदार बिडवाई याने फिर्यादी आणि त्यांच्या मुला विरोधात सावकारी व्यवहारातून हे दुकान खरेदी केल्याचा आणि दमदाटी केल्याचा खोटा व निराधार आरोप करत थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जा सोबत जोडण्यात आलेल्या कागद पत्रांमध्ये ज्योतिरादित्य मोकाशी व केदार बिडवाई यांच्यामध्ये २०२२ मध्येच एक समझोता करार झाल्याचे भासवण्यात आले होते. या अर्जाची गंभीर दखल  घेत दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने या प्रकरणाची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान अर्जात नमूद केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य किंवा सत्यता आढळून आली नाही, त्यामुळे हा अर्ज प्रशासना कडून दफ्तरी दाखल करण्यात आला होता.

         पोलिसांकडे अर्ज फेटाळला गेल्यानंतर फिर्यादी राजेंद्र मोकाशी यांनी माहिती अधिकार कायद्याचा (RTI) आधार घेऊन या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे अधिकृतपणे प्राप्त केली. या कागदपत्रे आणि कराराची छाननी केली असता केदार बिडवाई याने सादर केलेला कथित समझोता करार पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्या करारावर फिर्यादी यांचा मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी यांची हुबेहूब बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे, ज्या समझोता करारावर २०२२ सालची तारीख टाकण्यात आली होती, प्रत्यक्षात त्यासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर २०२५ सालातील होता. यावरून हा संपूर्ण करार नंतरच्या काळात परस्पर तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले. करारातील बनावटपणा आणि फसवणूक उघड होऊ नये म्हणून केदार बिडवाई याने पोलीस आयुक्तांकडे अर्ज करताना मूळ कागदपत्रे जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवली आणि केवळ झेरॉक्स प्रतच सादर केली होती, हे तपासात स्पष्ट झाले.

        फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबा विरुद्ध भक्कम पुरावा तयार करण्यासाठी केदार बिडवई आणि विनोद रमेश कुलकर्णी यांच्यातील काही वैयक्तिक बँक व्यवहारांचा आधार घेण्यात आला, ज्याचा प्रत्यक्षपणे फिर्यादी किंवा त्यांच्या व्यवहाराशी दूर दूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. केवळ कायदेशीर फायदा मिळवून घेण्यासाठी, बदनामी घडवून आणण्यासाठी आणि खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी हा सर्व कट रचण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हडपसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील सखोल तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

आरोग्यसेवेला आता ‘स्टार रेटिंग’; हलगर्जीपणावर थेट कडक कारवाई

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software