- Hindi News
- पुणे
- जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना मोठी कारवाई
जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना मोठी कारवाई
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलातील जेजुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने आणि एका खाजगी इसमाने (एजंट) संगनमताने लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कोर्टातील वॉरंट रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ५९ वर्षीय तक्रारदार यांचा कापडाचा व्यवसाय आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या कोर्टाचे वॉरंट रद्द करून देण्याच्या बदल्यात जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे यांनी लाचेची मागणी केली होती.
एसीबीची पडताळणी आणि कारवाई
तक्रारदाराने या संदर्भात पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. १० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, हवालदार दशरथ बनसोडे (वय ५७) यांनी वॉरंट रद्द करण्यासाठी २,००० रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात सचिन अरविंद चव्हाण या खाजगी इसमाने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. दोन्ही आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे. दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७ वर्षे, पद- पोलीस हवालदार, जेजुरी पोलीस स्टेशन), सचिन अरविंद चव्हाण (रा. वाल्हा, ता. पुरंदर – खाजगी इसम) अशी आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७अ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही मोहीम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास, नागरिकांनी तात्काळ एसीबी पुणे कार्यालयाशी ०२०-२६१२२१३४ या क्रमांकावर किंवा १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
