बजाज फिनसर्व्हच्या नव्या मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा

पुण्यात ६ हजार कोटींच्या बजाज फिनसर्व्ह मुख्यालयाचे भूमिपूजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

पुणे: पुण्यातील प्रस्तावित परिसरात बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून उभारण्यात येणारे अत्याधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त नवे मुख्यालय शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्याला देशातील आधुनिक, पर्यावरणपूरक आणि वेगवान मोबिलिटी असलेले प्रमुख शहर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासना कडून आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या ऐतिहासिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

       कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे आणि मुंबई ही दोन महानगरे आता देशाची अधिकृत फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी बनली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळूरूला मागे टाकत एकूण फिनटेक गुंतवणुकी  पैकी तब्बल ६१ टक्के गुंतवणूक आपल्याकडे आकर्षित केली आहे. फिनटेक स्टार्टअप्समध्ये ५९ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली असून या क्षेत्रात ९०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. ही प्रगत इकोसिस्टीम आता नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक सारख्या इतर शहरांमध्येही नेण्याची गरज असून लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले. पुणे हे अत्यंत वेगाने वाढणारे शहर असून येथील वाढत्या लोकसंख्येला आणि वेगाला अनुरूप अशा बाह्य व अंतर्गत रिंगरोडसह भुयारी मार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. आगामी तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख देशातील एक अत्यंत वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पुण्यात उभारण्यात येत असलेला हा भव्य परिसर देशातील अत्यंत महत्त्वाची आणि शाश्वत व्यवस्था ठरणार असून, यात सुमारे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या परिसराला जोडणारा रस्ता आणि आवश्यक पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तयार केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, बजाज समूहाने पुण्यात एक भव्य कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा व्यक्त केलेला मनोदय महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रत्यक्षात आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

        यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजाज समूहाचा शंभर वर्षांचा गौरवशाली वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दूरदृष्टी यांचा सुंदर संगम या नव्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळेल, असे सांगितले. हा प्रकल्प पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनासोबत बजाज फिनसर्व्हचा झालेला ६ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार राज्यातील गुंतवणूक आणि वित्तीय सेवा क्षेत्राला नवी ऊर्जा देणारा ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वित्तीय सेवांना दिशा देण्याचे बजाज समूहाचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, इन्शुअरटेक आणि डिजिटल वित्तीय सेवांच्या क्षेत्रात पुण्यातील तरुण पिढीसाठी रोजगाराच्या आणि कौशल्यविकासाच्या अफाट संधी निर्माण होत असून, या आधुनिक कॅम्पसमुळे युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, असे त्यांनी सांगितले. आकुर्डी, वाळूज आणि चाकण परिसराच्या औद्योगिक विकासातही बजाज समूहाचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

           बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाची रूपरेषा मांडली. पुण्यातील ७.२ दशलक्ष चौरस फुटांचा हा नवा परिसर पूर्णपणे शाश्वतता, पर्यावरणपूरक रचना, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ऊर्जा व पाणी बचत तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक रचनेतून हा परिसर विकसित केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर देशपातळीवर एक आदर्श निर्माण करणाऱ्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीत आणखी एक सोनेरी पान जोडले जाणार आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

ध्वनि मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, साउंड सिस्टिम जप्त होणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software