- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शिक्षक भरतीला मोठा वेग; पवित्र पोर्टलद्वारे १३,१९९ उमेदवारांची शिफारस
शिक्षक भरतीला मोठा वेग; पवित्र पोर्टलद्वारे १३,१९९ उमेदवारांची शिफारस
पवित्र पोर्टलमार्फत महाराष्ट्रात १३,१९९ शिक्षकांची शिफारस. TAIT 2025 च्या गुणवत्तेवर आधारित पारदर्शक निवड; जिल्हा परिषदेत सर्वाधिक ८,४८१ पदे भरली जाणार.
मुंबई: राज्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी गती देणारी आणि बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत दिलासा दायक असलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखती शिवाय निवड प्रकारा अंतर्गत विविध शाळांसाठी तब्बल १३ हजार १९९ पदांवर पात्र उमेदवारांच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. या सर्व यशस्वी उमेदवारांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या आगामी शैक्षणिक कारकिर्दीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय विद्यानिकेतन तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली होती. या चाचणीच्या निकालांच्या आधारे मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये विविध व्यवस्थापनांमधील तब्बल १३ हजार १९९ उमेदवारांची शिक्षक पदासाठी अधिकृत शिफारस झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित निकषांवर राबविण्यात आल्यामुळे गुणवान व पात्र उमेदवारांना त्यांच्या हक्काचे स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवड झालेल्या या नवीन शिक्षकांवर भावी पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची अत्यंत महत्त्वाची व पवित्र जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) उद्दिष्टांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि मानवी मूल्यांची उत्तम जडणघडण करण्यासाठी सर्व शिक्षकांनी पूर्णपणे समर्पित भावनेने व निष्ठेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्याने रुजू होणाऱ्या या शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया अत्यंत कार्यक्षम आणि गुणवत्ताधिष्ठित पद्धतीने पूर्ण केली जात असून, शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिनवर निवडीची सविस्तर स्थिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारे देखील तात्काळ माहिती कळविण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागा तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. व्यवस्थापन निहाय विचार केल्यास, जिल्हा परिषदांच्या शाळांसाठी सर्वाधिक ८ हजार ४८१, महानगरपालिकांसाठी १ हजार ३०६, खाजगी शैक्षणिक संस्थांसाठी १ हजार ४५१, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांसाठी १ हजार ६०१, नगरपालिका व नगरपरिषदांसाठी २२६ तर शासकीय विद्यानिकेतनांसाठी ५४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच पद प्रकार व वर्गनिहाय विचार करता, इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्राथमिक स्तरासाठी ७ हजार ५४१, इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक स्तरासाठी ४ हजार २०७, इयत्ता नववी ते दहावीच्या माध्यमिक स्तरासाठी १ हजार ११९ तर इयत्ता अकरावी ते बारावीच्या उच्च माध्यमिक स्तरासाठी २५२ उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या मोठ्या शिक्षक भरतीमुळे राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, तसेच ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.
