- Hindi News
- पुणे
- कोथरुडमध्ये पूर्व वैमनस्यातून कोयत्याने हल्ला; इस्टेट एजंटसह मित्र जखमी, तिघे अटकेत
कोथरुडमध्ये पूर्व वैमनस्यातून कोयत्याने हल्ला; इस्टेट एजंटसह मित्र जखमी, तिघे अटकेत
पुण्याच्या कोथरुडमध्ये पौड रोडवर जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला. कोथरुड पोलिसांनी ३ आरोपींना केली तात्काळ अटक.
पुणे: पुण्याच्या कोथरुड परिसरात पूर्व वैमनस्यातून घडलेल्या एका अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका सराईत टोळक्याने इस्टेट एजंट आणि त्याच्या मित्राचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने व जीवघेण्या शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. या भयंकर हल्ल्यात तरुणाच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले असून, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी तत्परता दाखवत तीन हल्लेखोरांना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत, तर एका अन्य संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, याप्रकरणी आदित्य दादा मारणे (वय २४, रा. साई व्हिला, इंगळेनगर, भुगांव) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश ऊर्फ शुभम मधुकर वाघमारे (वय २८, रा. न्यू लक्ष्मीनगर, गुजरात कॉलनी, कोथरुड), प्रसाद ऊर्फ मुन्ना भगवान मोरे (वय २२, रा. तळजाई वसाहत), आणि आदित्य प्रदीप सकटे (वय २४, रा. न्यू लक्ष्मीनगर, गुजरात कॉलनी, कोथरुड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर हरीष वाघमारे (रा. गुजरात कॉलनी) याच्यावरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही गंभीर घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पौड रोडवरील किनारा हॉटेलच्या पुढे चांदणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.
फिर्यादी आदित्य मारणे हे इस्टेट एजंट म्हणून काम करतात, तर आरोपी भाजी विक्री, डिलिव्हरी बॉय आणि जीम ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्यात काही कारणावरून आपापसात वाद व भांडणे झाली होती. घटनेच्या दिवशी सायंकाळी आदित्य मारणे हे आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गुजरात कॉलनीतील जय मल्हार मित्र मंडळ येथे आले होते. ते मित्रांसोबत गप्पा मारत उभे असताना आरोपी तिथे आले आणि जुन्या भांडणाचा विषय काढून विनाकारण वाद घालू लागले. परिस्थिती बिघडू नये म्हणून वाद टाळण्यासाठी आदित्य मारणे व त्यांचा मित्र साहिल ठोंबरे हे दोघे दुचाकीवरून तिथून निघून गेले. मात्र, संतापलेल्या आरोपींनी त्यांच्या मागे वाहन घालून त्यांचा पाठलाग केला. ते किनारा हॉटेल चौकात आले असताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीला आपली गाडी आडवी मारून रस्ता अडवला. त्यामुळे घाबरून दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एका उभ्या कारला धडकून खाली कोसळले.
दोघे खाली पडल्याची संधी साधत मुख्य आरोपी ऋषिकेश वाघमारे याने हातातील धारदार कोयत्याने साहिल ठोंबरेच्या चेहऱ्यावर वार केला. त्यानंतर "तुला आज जिवंतच सोडत नाही," असे म्हणत त्याने साहिलच्या गळ्यावर अत्यंत प्राणघातक दुसरा वार केला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या फिर्यादी आदित्य मारणे यांच्या डोक्यात प्रसाद मोरे याने मोठ्या दगडाने जोरदार प्रहार केला, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सर्व रक्तरंजित प्रकार पाहून रस्त्यावरील नागरिक जमा होऊ लागले. हे पाहून आरोपी ऋषिकेश वाघमारे याने हातातील कोयता हवेत फिरवून, "आता जर कोणी मध्ये आले, तर कोणालाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत परिसरात मोठी दहशत निर्माण केली आणि चौघेही अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहिल ठोंबरे याच्या गळ्यावर, हनुवटीवर, उजव्या अंगठ्याला आणि दोन्ही गुडघ्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत, तर आदित्य मारणे यांच्या डोक्यातही मोठी जखम झाली आहे. दोन्ही जखमींना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील कसून तपास सुरू आहे.
