- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- छत्रपती संभाजीनगर विभागात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी जाहीर
छत्रपती संभाजीनगर विभागात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; ३१ ऑगस्टला प्रारूप यादी जाहीर
छत्रपती संभाजीनगर येथे SIR मोहिमेचा आढावा. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे मतदार यादी पुनरीक्षण पारदर्शक ठेवण्याचे निर्देश. ३१ ऑगस्टला येणार प्रारूप यादी.
छत्रपती संभाजीनगर: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेच्या आगामी टप्प्यातील कामकाज अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि पूर्णपणे नागरिका भिमुख ठेवण्याचे सक्त निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणारे अर्ज, सूचना तसेच हरकतींवर तत्परतेने आणि नियमा नुसार कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, लातूर यांसह विभागातील सर्व आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सहआयुक्त मंजुषा मिसकर आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी मतदार यादीची पाने आणि आवश्यक नोटिसांच्या छपाईचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हानिहाय उपलब्ध यंत्रसामग्री आणि संबंधित संस्थांच्या क्षमतेचा आढावा घेत छपाईचे काम विहित मुदतीत पार पाडण्यास सांगण्यात आले. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सक्रिय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप यादीत समाविष्ट नसल्यास, त्यांची सध्याची निवासस्थिती तपासून नियमा नुसार नमुना क्रमांक ६ भरून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी. नागरिकांना या संपूर्ण प्रक्रिये बाबत स्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास संभ्रम निर्माण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणूक अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यात योग्य समन्वय राखून नागरिकांच्या शंकांचे तात्काळ निरसन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक भारतीय नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी निवडणूक आयोग कटिबद्ध असल्याचे सांगत श्री. चोक्कलिंगम यांनी कागदपत्रांची पडताळणी आणि नोटीस बजावण्याच्या प्रक्रियेत स्थानिक परिस्थिती नुसार सुयोग्य पद्धत अवलंबण्यास सांगितले. मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र व इतर वैध कागदपत्रांच्या आधारे पडताळणी मोहीम अधिक सुलभ करण्यात यावी. तसेच नव्याने पात्र होणाऱ्या युवा मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी महाविद्याय आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले. तत्पूर्वी, सहाय्यक आयुक्त श्रीमती मिसकर यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांत एसआयआरच्या पहिल्या टप्प्यातील काम निर्धारित कालावधीत यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती दिली, तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील घरटी सर्व्हे, डिजिटलायझेशन आणि मतदारांच्या पडताळणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला.
दरम्यान, एसआयआरच्या सुधारित वेळापत्रका नुसार आगामी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादी जाहीर झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना आपले दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या दावे-हरकतींवर नोटीस बजावणे आणि ते कायदेशीर रीत्या निकाली काढण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आगामी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे प्रशासना कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
