मुंबई महापालिकेत महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत; शिंदे गटाला महापौरपद

मुंबई महापालिकेत महायुतीचा नवा सत्तावाटप फॉर्म्युला चर्चेत. दुसऱ्या अडीच वर्षांच्या टप्प्यात शिंदे गटाला मिळणार सव्वा वर्षासाठी महापौरपद.

मुंबई: राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार भविष्यात मुंबई पालिकेचे महापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीच्या समन्वय समितीत झालेल्या वाटाघाटींनुसार, पालिकेच्या सत्तेचा टप्पा ठरवण्यात आला असून, यामुळे मुंबईच्या राजकारणात आगामी काळात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

     सध्या मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता असून भाजपाच्या नेत्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर म्हणून पदभार सांभाळत आहेत. महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्या विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आणि विरोधकांच्या निशाण्यावर राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मान्सून काळात मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, सखल भागांत पाणी साचणे, तसेच मॅनहोलमध्ये नागरिकांचे मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनांमुळे प्रशासकीय नियोजनावर आणि पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पावसाळ्या पूर्वीची कामे पूर्ण ताकदीने आणि योग्य नियोजनासह न झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती मधील राजकीय समीकरणे आणि आगामी रणनीती बाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

         विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई महापालिकेच्या महापौरपदा बाबत महायुतीमध्ये एक विशिष्ट फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्या अडीच वर्षांच्या टप्प्यात पालिकेचे महापौरपद पूर्णपणे भाजपाकडेच राहणार असून, सध्या रितू तावडे या पदावर कार्यरत आहेत. मात्र, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी भाजप आणि शिंदेंच्या सेनेत 'सव्वा-सव्वा वर्षांचा' नवा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सूत्रानुसार, दुसऱ्या अडीच वर्षांच्या पहिल्या सव्वा वर्षात म्हणजेच मध्यंतरीच्या काळात शिंदेंच्या शिवसेनेचा नेता मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल, तर त्यानंतरच्या उर्वरित सव्वा वर्षांत पुन्हा एकदा हे पद भाजपाकडे हस्तांतरित केले जाईल. महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला या संदर्भातील शब्द देण्यात आला होता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

     मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणातील हा संभाव्य बदल प्रत्यक्षात आल्यास महायुती मधील पक्षांतर्गत सामंजस्य आणि समतोल राखण्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. आगामी काळात हा फॉर्म्युला पूर्णपणे अमलात येणार का आणि शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपद मिळाल्यास ते मुंबईच्या विकासासाठी नेमकी कोणती पावले उचलणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुल्याचे आणि मुंबईकरांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार

Latest News

नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार नेपाळच्या संकटात भारताची मदत; बालेन शाह पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार
नेपाळ पूरपरिस्थितीत भारताने पाठवली १० टन मदत सामग्री. संबंध सुधारल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा पहिला भारत दौरा ठरण्याची शक्यता....
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना; २ कोटींसाठी विवाहितेचा छळ
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होणार? श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मोठी पावले; लष्करी संवाद अधिक दृढ करण्यासह आठ मुद्द्यांच्या सहमतीवर शिक्कामोर्तब
मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर स्वच्छतेवर भर द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software