- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गणेशभक्तांच्या सोयीसाठी रायगड सज्ज; महामार्गावर सुविधा आणि सुरक्षेवर भर
गणेशभक्तांच्या सोयीसाठी रायगड सज्ज; महामार्गावर सुविधा आणि सुरक्षेवर भर
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त. मुंबई-गोवा महामार्गावर १० सुविधा केंद्रे, २० रुग्णवाहिका व टोईंग क्रेन तैनात; दहीहंडीसाठी सेफ्टी बेल्ट अनिवार्य.
रायगड: आगामी गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात, सुरक्षित आणि कोणत्याही विघनाविना पार पाडण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हा नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय शांतता समितीच्या बैठकीत वीज, पाणी, वाहतूक आणि सुरक्षेच्या उपाय योजना अत्यंत काटेकोरपणे राबवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या आनंदात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी पूर्वतयारी ठेवावी, असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिल्या. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवा दरम्यान होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती देणारे स्पष्ट दिशादर्शक फलक योग्य ठिकाणी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रवास करताना एखादे वाहन बिघडल्यास ते तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि महामार्गावर टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच दहीहंडीच्या आयोजनात सुरक्षेच्या सर्व नियमांची आणि मानकांची पूर्तता केल्याशिवाय आयोजकांना परवानगी दिली जाऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.
बैठकीत मार्गदर्शन करताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शांतता समितीच्या सदस्यांचे पुढील तीन दिवसांत पोलिस सत्यापण (Police Verification) पूर्ण करून त्यांना तातडीने ओळखपत्रे देण्याच्या सूचना केल्या. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी महत्त्वाची मदत करू शकणाऱ्या स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी जिल्हा प्रशासनाने अगोदरच समन्वय ठेवावा, असे त्यांनी सुचवले. वाहतूक कोंडीच्या काळात अनेक तास खोळंबणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक शौचालये आणि सुविधा केंद्रे उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दहीहंडी उत्सवासाठी परवानगी देताना 'सेफ्टी बेल्ट'ची अनिवार्यता ही अत्यंत महत्त्वाची अट ठेवून सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी दिली. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी ७ पोलिस उपनिरीक्षक, १२८ पोलिस अधिकारी, १ हजार ९०० पोलिस अंमलदार, ४०० होमगार्ड तसेच एसआरपीएफची (SRPF) १ कंपनी तैनात करण्यात येणार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २५ मोटारसायकल, २० टोईंग क्रेन आणि २० रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशभक्तांच्या सोयीसाठी खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर या १० प्रमुख ठिकाणी विशेष सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष, पोलिस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी आवश्यक सुविधा आणि टायरमध्ये हवा भरण्याची मोफत सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्वंकष नियोजनामुळे रायगड जिल्ह्यात आगामी सण अत्यंत शांततेत, निर्विघ्नपणे आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
