- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांसाठी मदतीचा हात; चार मिनी बस रवाना
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १०६ प्रवाशांसाठी मदतीचा हात; चार मिनी बस रवाना
नेपाळ पूर परिस्थितीत काठमांडू येथे अडकलेल्या १०६ महाराष्ट्रीयन प्रवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ४ मिनी बसेसची सोय. प्रवासी दानापूरमार्गे परतणार.
मुंबई: नेपाळमधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे काठमांडू येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १०६ प्रवाशांचा सुरक्षित परतीचा प्रवास अखेर सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या प्रभावी समन्वयामुळे या प्रवाशांसाठी काठमांडूहून जनकपूरपर्यंत चार मिनी बसेसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमधील बिघडलेल्या दळणवळण परिस्थितीमुळे मोठ्या बसने प्रवास करणे अशक्य झाल्याने निर्माण झालेला पेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थीमुळे सुटला असून, यामुळे संकटात सापडलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेपाळमध्ये पर्यटनासाठी किंवा इतर कामांसाठी गेलेले महाराष्ट्रातील १०६ नागरिक काठमांडूमध्ये अडकले होते. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार या सर्व प्रवाशांना २८ ऑगस्ट रोजी बिहारमधील दानापूर येथून संघमित्रा एक्सप्रेसने महाराष्ट्रात परतणे आवश्यक होते. मात्र, नेपाळ मधील सद्यस्थितीमुळे काठमांडूहून मोठ्या बसने सीमावर्ती भागापर्यंत किंवा दानापूरपर्यंत प्रवास करणे पूर्णपणे अशक्य झाले होते. ठरलेल्या वेळेत दानापूर रेल्वे स्थानक गाठणे अवघड झाल्यामुळे प्रवाशांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या गंभीर संकटाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही वेळ वाया न घालवता थेट प्रवासी योगेश गावंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सविस्तर परिस्थिती जाणून घेतली.
परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नेपाळमधील स्थानिक प्रशासन तसेच नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशी अत्यंत वेगाने समन्वय साधला. मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यानंतर खासदार संदीप राणा यांनी तातडीने पावले उचलत काठमांडूहून जनकपूरपर्यंत चार मिनी बसेसची सोय उपलब्ध करून दिली. या सर्व व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर सर्व १०६ प्रवासी काठमांडूहून जनकपूरच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाले आहेत. हे सर्व प्रवासी उद्या सकाळी जनकपूर मार्गे भारत-नेपाळ सीमेवर पोहोचणार असून, तिथून त्यांना बिहारमधील दानापूरपर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दानापूर रेल्वे स्थानकातून संघमित्रा एक्सप्रेसने हे सर्व प्रवासी सुखरूप महाराष्ट्रात परतणार आहेत. सर्व प्रवासी सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवून असून, संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेबद्दल योगेश गावंडे आणि इतर सर्व सहप्रवाशांनी त्यांचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.
