'राजकारणात राहावं की नाही...' धनंजय मुंडेंचे सूचक विधान

धनंजय मुंडे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर खंत व्यक्त करत सूचक विधान केले. पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय खळबळ.

बीड: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय निवृत्ती आणि संन्यासाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून रिटायर्ड होण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांचे बंधू तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीबाबत एक मोठे व सूचक विधान केले आहे. राजकारणातील सध्याची घसरलेली पातळी आणि जाती पातीच्या राजकारणावर तीव्र खंत व्यक्त करताना, "मला खरंच आज राजकारणात राहावं की न राहावं, असा प्रश्न पडतो," असे खुले विधान धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे मुंडे बहीण-भावाच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर जोरदार भाष्य केले. ते म्हणाले की, "सध्या तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. आज सगळीकडे जाती पातीचे आणि धर्माचे राजकारण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला अनेकदा वाटतं की, खरंच या राजकारणात राहावं की नाही?"

मात्र, एवढे बोलून थांबत नाही, तर त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "पण नंतर लक्षात येतं की, आपल्याला समाजात पुन्हा समता प्रस्थापित करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार आणि आदर्श आमच्या पाठीशी आहेत." या माध्यमातून आपण राजकारणातून काढता पाय घेणार नसून, समाजहितासाठी आणि विकासासाठी कायम राजकारणात सक्रिय राहून काम करत राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीत एका कार्यक्रमात बोलताना रस्त्यांच्या दूरवस्थेवर संताप व्यक्त केला होता. खराब रस्त्यांवरून प्रवास करून आल्यानंतर आलेल्या कंटाळ्यानुसार, आपल्याला राजकारणातून रिटायर्ड व्हावंस वाटतं, असं आपल्या पीएला सांगितल्याची आठवण त्यांनी भर सभेत बोलून दाखवली होती. मात्र, उपस्थितांचा उत्साह पाहून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचे स्पष्ट करत त्यांनीही माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पंकजा मुंडे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडून स्वतंत्र व बिनधास्त नेतृत्व करत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसकडून खुली ऑफरही दिली होती.

एकापाठोपाठ एक अशा दोन्ही मुंडे बहीण-भावांनी राजकारणातून निवृत्ती किंवा संन्यासाबाबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाष्य केल्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. आगामी काळात या विधानांचे राजकीय संदर्भ काय असतील आणि बीडचे राजकारण नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करेल, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software