- Hindi News
- पुणे
- भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाला गती; कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश
भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाला गती; कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाची पाहणी केली. १६७ एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग सुकर.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले. शहराला नियोजित वेळेत या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून दरवर्षी ६०.७९ दशलक्ष घनमीटर (सुमारे १६७ दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी मंजूर केले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील बीपीटीपर्यंत १७०० मिमी व्यासाची उदंचन जलवाहिनी तसेच तेथून देहूपर्यंत १४०० मिमी व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकण्याच्या कामाची पाहणी केली.
आयुक्तांनी धरण परिसरातील सुमारे १०० फूट खोल बोगद्यात उतरून जॅकवेलच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा वेग समाधानकारक असल्याचे नमूद करत उर्वरित कामे अधिक वेगाने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, "भामा आसखेड पाणीपुरवठा योजना ही शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेशी किंवा सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत."
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील तसेच संबंधित ठेकेदार आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते.
