- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- विमा भरपाईत विलंब नको; नितेश राणे आक्रमक
विमा भरपाईत विलंब नको; नितेश राणे आक्रमक
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी फळपिक विमा भरपाईवरून विमा कंपन्यांना सुनावले. तांत्रिक त्रुटी दूर करून त्वरित भरपाई देण्याचे आदेश.
सिंधुदुर्गनगरी: फळपिक विमा भरपाईपासून केवळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील किंवा जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, असा कडक पवित्रा घेत विमा कंपनीकडील सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण त्वरित करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. सिंधुदुर्गनगरी येथे भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) आणि स्कायमेट वेदर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या फळपिक विम्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बढे, कृषी विमा कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक अतुल झणकर, स्कायमेटचे राज्य व्यवस्थापक संजय मोरे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत फळपिक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे, दरवर्षी फळपिक विम्याची नुकसान भरपाई साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वितरित केली जाते; मात्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थेट जुलै महिन्यातच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे, जी एक अभिमानास्पद बाब आहे.
दरम्यान, विमा कंपनीने कागदपत्रांतील त्रुटींचे कारण देत २ हजार ९६ अर्ज परत पाठवले आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, यातील सुमारे १ हजार ७५ अर्जांची पूर्तता संबंधित सीएससी (CSC) केंद्रांचे आयडी बंद किंवा ब्लॉक असल्यामुळे होऊ शकलेली नाही. यावर तीव्र चिंता व्यक्त करत, ज्या शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता नियमानुसार भरला आहे, त्यांना केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे लाभापासून वंचित राहावे लागणे चुकीचे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. यासाठी तात्काळ संबंधित सीएससी आयडी पूर्ववत करून किंवा पर्यायी मार्गाने त्रुटींची पूर्तता करून उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई वितरित करावी, अशा सक्त सूचना त्यांनी विमा कंपनीला दिल्या.
तापमानातील वाढ व अवेळी हवामानातील बदलांमुळे प्रत्यक्ष नुकसान होऊनही केवळ तांत्रिक नोंदींच्या अभावामुळे ज्या महसूल मंडळांना अद्याप विमा लाभ मिळालेला नाही, त्या ठिकाणच्या हवामान नोंदी आणि स्कायमेटच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या कार्यपद्धतीची सखोल तपासणी करण्यात यावी. तसेच या तांत्रिक बाबींचे पुनर्विलोकन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
फळपिक विमा योजनेतील सर्व तांत्रिक अडचणी आणि हवामान नोंदींशी संबंधित गुंतागुंतीच्या बाबींचा सखोल निपटारा करण्यासाठी लवकरच मंत्रालय स्तरावर विमा कंपनी व स्कायमेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित विमा दावे आणि तांत्रिक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
