- Hindi News
- पुणे
- माऊली कटके यांचा उरुळी कांचन विकास आराखडा
माऊली कटके यांचा उरुळी कांचन विकास आराखडा
उरुळी कांचन परिसर नव्या पुण्याचे केंद्र व लॉजिस्टिक हब होणार. मेट्रो, रिंग रोड व पुरंदर विमानतळ जोडणीबाबत आमदार माऊली कटके यांचे वक्तव्य.
उरुळी कांचन: पुर्व हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसर भविष्यात नव्या पुण्याचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आणि प्रमुख 'लॉजिस्टिक हब' म्हणून विकसित होणार आहे. या भागात मेट्रो सेवा, रिंग रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे हब तसेच आगामी पुरंदर विमानतळाशी थेट जोडणी उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा मानस असून, त्यादृष्टीने लवकरच एक सर्व समावेशक रोडमॅप तयार केला जाईल, असा विश्वास शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केला आहे.
दौंड तालुक्यातील श्री क्षेत्र डाळिंब बन येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते संपन्न झाली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उरुळी कांचनच्या विकासाचा आराखडा स्पष्ट केला. ते म्हणाले की, हडपसर ते यवत उन्नत मार्गाअंतर्गत तळामध्ये सुमारे १०० फूट रुंदीचे सहा पदरी रस्ते असणार आहेत. त्यावर पुन्हा सहा पदरी उन्नत मार्ग आणि त्याच्या वर मेट्रो मार्ग अशा स्वरूपाचे या बहुस्तरीय (Multi-level) एलिव्हेटेड कॉरिडोरचे नियोजन आहे. तसेच, ज्या-ज्या ठिकाणी हा मार्ग गावांमध्ये खाली उतरणार आहे, तिथे सुमारे १७० फूट रुंदीचे मोठे रस्ते विकसित केले जातील. हा उन्नत मार्ग थेऊरफाटा, कोरेगाव मूळ हद्दीतील प्रयागधाम फाट्यावरील रिंग रोड क्रॉसिंग आणि सहजपूर या ठिकाणी खाली उतरणार आहे.
उरुळी कांचन पर्यंत मेट्रो विस्तारणे, रिंग रोडची जोडणी, रेल्वे हबचा विकास आणि विशेषतः उरुळी कांचन येथून थेट पुरंदर विमानतळाला मेट्रोने जोडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. या सर्व दळण वळणाच्या उत्तम सुविधांमुळे हा संपूर्ण परिसर भविष्यात एक मोठे 'लॉजिस्टिक पार्क' म्हणून नावारूपास येईल आणि राज्य सरकार त्यानुषंगानेच पावले उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री क्षेत्र डाळिंब बन येथील आषाढी एकादशी महापूजा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे हे होते. यावेळी त्यांच्यासह माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, दौंड प.स. सभापती सुखदेव चोरमले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, दौंड पंचायत समिती सदस्य राजश्री म्हस्के, डाळींबचे सरपंच बजरंग म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते.
