- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुख्यमंत्री फडणवीसांनीच घडवली मुश्रीफ-घाटगे युती; समरजितसिंह घाटगेंचा मोठा खुलासा
मुख्यमंत्री फडणवीसांनीच घडवली मुश्रीफ-घाटगे युती; समरजितसिंह घाटगेंचा मोठा खुलासा
कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीपूर्वी घाटगेंचा मोठा राजकीय खुलासा.
कोल्हापूर : कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नियोजन बैठकीत शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी महत्त्वपूर्ण राजकीय खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील राजकीय युती घडवून आणली असून, कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कागल नगरपरिषदेच्या वतीने बॅरिस्टर खर्डेकर चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (९ ऑगस्ट) होणार असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
याच दिवशी श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिराच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण तसेच भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी संयुक्तपणे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "कागलमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नसल्याची खंत अनेक वर्षे होती. आता कागलवासीयांचे हे स्वप्न साकार होत असून, हा ऐतिहासिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पाडूया."
समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातूनच मंत्री हसन मुश्रीफ आणि माझ्यातील राजकीय युती झाली. कागल तालुक्याचा विकास वेगाने व्हावा, रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी कागलमध्ये येत असल्याने त्यांच्यासमोर ही एकजूट प्रभावीपणे दिसून यावी, असेही त्यांनी आवाहन केले.
याशिवाय, आगामी फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री पुन्हा कागल दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, युवराज पाटील, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, विकास पाटील, शशिकांत खोत, मुख्याधिकारी अजय पाटणकर, प्रकाश गाडेकर, सुशांत कालेकर, अरुण गुरव, रणजित पाटील, बाळासो माळी, आनंदा पसारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जयवंत रावण यांच्या स्वागताने झाली. नगराध्यक्ष सविता माने यांनी प्रास्ताविक केले, विजय काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपक मगर यांनी आभार मानले.
