जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; १७ ऑगस्टला श्रावणषष्ठी यात्रा

श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर १७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावणषष्ठी यात्रा साजरी होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज.

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी आदिमाया चोपडाई देवीची पारंपरिक श्रावणषष्ठी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. या धार्मिक व ऐतिहासिक यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षेला आणि सोयीसुविधांना प्राधान्य दिले जात आहे.

यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी जोतिबा डोंगरावर विविध शासकीय विभागांच्या उच्चस्तरीय आढावा बैठका पार पडल्या आहेत. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, अधीक्षक धैर्यशील तिवले आणि कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका संपन्न झाल्या. या बैठकांमध्ये यात्रा काळातील कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सपाटीकरणाचे नियोजन होते. मात्र, चालू असलेल्या सलग आणि मुसळधार पावसामुळे हे काम करताना प्रशासनाला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून युद्धपातळीवर पर्यायी नियोजन केले जात आहे. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य पथके पूर्णपणे सज्ज ठेवण्यात येणार असून डोंगरावर कडक स्वच्छता राखण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आदिमाया चोपडाई देवीच्या या श्रावणषष्ठी यात्रेसाठी १७ व १८ ऑगस्ट दरम्यान लाखो भाविक जोतिबा डोंगरावर उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन केले जात असल्याची माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी दिली आहे. आगामी गुरुवारी (ता. ६) प्रांताधिकारी आणि तहसील दारांच्या प्रमुख उपस्थितीत षष्ठी यात्रेची आणखी एक महत्त्वाची आढावा बैठक होणार असून, त्यानंतर पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक पार पडणार आहे. यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ, पुजारी, व्यापारी आणि भाविकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

मुंबई उपनगरातील विकास कामांना वेग; आशिष शेलारांचे प्रशासनाला निर्देश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software