पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्र अव्वल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पुरस्कार

PMFME अन्न प्रक्रिया योजनेत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला. दिल्लीत चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पुरस्कार.

नवी दिल्ली: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशभरात अभूतपूर्व यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च मान मिळवला आहे. उत्कृष्ट कार्य प्रणालीसाठी महाराष्ट्राला प्रदान करण्यात आलेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजक आणि संपूर्ण कृषी विभागाच्या अथक परिश्रमांची व मेहनतीची पावती असल्याचे गौरवोद्गार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले आहेत. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. या महत्वपूर्ण प्रसंगी संचालक विनयकुमार आवटे व पीएमएफएमईचे स्टेट लीड मॅनेजर अमोल चिद्रावर हे देखील उपस्थित होते.

        या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ९५६ प्रक्रिया प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विशेष कौतुकाची बाब म्हणजे महिला लाभार्थी प्रकल्पांची संख्या तब्बल १७ हजार ९४१ म्हणजेच एकूण प्रकल्पांच्या ५६ टक्के इतकी मोठी आहे. यामध्ये वैयक्तिक प्रकल्पांसोबतच ५२२ गट व समूह तसेच ७५ सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे ३,१५५ कोटी रुपयांच्या घरात असून, याद्वारे ७१५ कोटी रुपयांचे विक्रमी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशभरात सर्वाधिक म्हणजेच ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे कौशल्य प्रशिक्षण महाराष्ट्रात पूर्ण झाले असून, अनुदान वितरणाच्या बाबतीतही राज्याने देशात आघाडी घेतली आहे. ‘बीज भांडवल’ (Seed Capital) योजनेंतर्गत स्वयं सहायता समूहांच्या ६१ हजार ३२३ सदस्यांना २२१ कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत सुलभ करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगला मोठी चालना मिळत असून, राज्यात सुमारे २ लाख ६४ हजार प्रत्यक्ष आणि जवळपास ७ लाख ९२ हजार अप्रत्यक्ष रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

          देशभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अग्रगण्य १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल ७ जिल्ह्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे, जी राज्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे कृषीमंत्र्यांनी नमूद केले. हा राष्ट्रीय सन्मान केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाचा आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. याशिवाय, पीएमएफएमई योजने अंतर्गत विशेष कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. एवढेच नव्हे तर, ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी श्रीधर दुबे पाटील व अश्विनी अकुसकर यांनी, तर शहरी उपजीविका अभियानासाठी सहआयुक्त नूतन खाडे आणि राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा संसाधन व्यक्तींनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. कृषीमंत्री, राज्यमंत्री, कृषी सचिव आणि कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून मिळालेल्या या यशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी आणि भक्कम ऊर्जा मिळवून दिली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

महाराष्ट्र पोलीस दलात १२ नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची भर; पाच महिलांचा समावेश

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software