श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नावावरून महापालिकेत खडाजंगी; बालवडकरांच्या सूचनेने भाजपची कोंडी

पुणे महापालिकेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्रावरून गदारोळ. राष्ट्रवादी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या उपरोधिक उपसूचनेमुळे भाजप नगरसेवक कात्रीत.

पुणे: पुणे महानगरपालिका सभागृहात मंगळवारी एका अनोख्या आणि रंगतदार राजकीय घडामोडी मुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची मोठी तारांबळ उडाली. भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विषयीच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मांडलेल्या एका उपरोधिक सूचनेने सभागृहात खळबळ उडवून दिली. मुखर्जी यांच्या विषयी प्रत्येकाने किमान दहा मिनिटे भाषण करावे, अशी अचानक मागणी करत बालवडकर यांनी भाजप नगरसेवकांना अक्षरशः कात्रीत पकडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

      महापालिका सभागृहात भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि अर्चना पाटील यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे महापालिकेत तैलचित्र बसवावे आणि दरवर्षी त्यांना विधिवत पुष्पहार अर्पण करावा, असा अधिकृत प्रस्ताव मुख्यसभेत मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी एक उपसूचना (Amendment) पुढे केली. या उपसूचनेत त्यांनी मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव करताना, "भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, ३७० कलमाला सर्वप्रथम विरोध करणारे आणि 'एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चलेंगे' अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त" असा उल्लेख करावा, अशी मागणी केली. यासोबतच, या विषयावर ज्यांना माहिती नाही त्यांना ती व्हावी यासाठी सभागृहातील प्रत्येक सदस्याने, विशेषतः अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या काही विशिष्ट नगरसेवकांनी किमान दहा मिनिटे भाषण करावे, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली.

        बालवडकर यांची ही मागणी अत्यंत उपरोधिक असून या विषयावर तातडीने सविस्तर बोलणे अनेक नगरसेवकांसाठी अवघड होऊन बसणार आहे, याची जाणीव झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या गोटात मोठी चलबिचल सुरू झाली. हा आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा आणि विचार सरणीचा अपमान असल्याचे भासत असल्याचा पवित्रा घेत भाजप नगरसेवकांनी बालवडकरांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी करत सभागृहात जोरदार गदारोळ घातला. मात्र, या संपूर्ण गोंधळात सत्ताधारी पक्षाच्या एकाही नगरसेवकाने धैर्याने पुढे येऊन, "मी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबद्दल सविस्तर बोलू शकतो," असे छाती ठोकपणे म्हटले नाही.

       सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावर कोंडीत पकडल्यानंतर आणि आपले राजकीय उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्या सूचनेवरून अमोल बालवडकर यांनी आपली उपसूचना मागे घेतली. त्यानंतर अखेर संबंधित मूळ प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे महापालिका सभागृहात काही काळ तणाव आणि मिश्किल वातावरणाची संमिश्र अनुभूती पाहायला मिळाली असून, याचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती

Latest News

हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती हाफकिन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता; आश्वासित प्रगती योजनेला गती
हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत विधान भवनात बैठक. उपसभापती सचिन अहिर व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे...
चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याची नवी झेप; २,३२० कोटींच्या गुंतवणुकीने विकासाला वेग
नेपाळच्या पुरात भारतीय पर्यटक संपर्कविहीन; महाराष्ट्र सरकारकडून विशेष हेल्पलाईन सुरु
अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राज्यपालांना राखी; लोकभवनात रक्षाबंधन उत्साहात
महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य; ‘उमेद’ अभियानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software