- Hindi News
- सातारा
- उत्सवांच्या दिखाव्यापेक्षा वास्तव महत्त्वाचे; दहिवडीतील परिसंवादात तज्ज्ञांचे मत
उत्सवांच्या दिखाव्यापेक्षा वास्तव महत्त्वाचे; दहिवडीतील परिसंवादात तज्ज्ञांचे मत
दहिवडीत शिवसंकल्प फाउंडेशनतर्फे 'महाराष्ट्रातील समकालीन प्रश्न' विषयावर परिसंवाद. डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश परब व मान्यवरांचे ज्वलंत मुद्द्यांवर मार्गदर्शन.
दहिवडी: मराठी माणूस केवळ डीजे, ढोल-ताशे, भव्य मिरवणुका आणि पूर्व गौरवाच्या आठवणीं मध्ये रमून राहिला, तर त्याच्या हक्काच्या जमिनी, व्यवसाय आणि रोजगाराच्या बहुमूल्य संधी इतर घटकांच्या हातात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता उत्सवांच्या बाह्य भपक्यात आणि देखाव्यां मध्ये न रमता समाजाने शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि वास्तव प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले आहे. शिवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने दहिवडी येथे आयोजित ‘महाराष्ट्रातील समकालीन प्रश्न’ या विषयावरील विशेष परिसंवादात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
दहिवडी येथे पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादाचे आयोजन शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब, प्रा. रोहित पाटील, पत्रकार प्राजक्ता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता म्हेत्रे यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. दीपक पवार यांनी मराठी तरुणांना भविष्याचा वेध घेत केवळ सोशल मीडिया वरील स्टेटस आणि उत्सवांपुरते मर्यादित न राहता हक्काच्या अधिकारांसाठी सजग होण्याचे आवाहन केले.
या परिसंवादात इतर वक्त्यांनीही महाराष्ट्रा पुढील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल प्रकाश टाकला. डॉ. प्रकाश परब यांनी आपल्या मनोगतात, सद्यस्थितीत समाजाची वाटचाल बौद्धिक ऱ्हास आणि सांस्कृतिक सपाटी करणाच्या दिशेने सुरू असल्याची खंत व्यक्त केली. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्या शिवाय प्रगती होत नाही हा एक मोठा भ्रम असून, मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करतानाच सुजाण व विचारशील नागरिकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, प्रा. रोहित पाटील यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांवर होणाऱ्या संभाव्य अन्यायाबद्दल चिंता व्यक्त केली. लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना त्याचा फटका बसू नये, याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या मुद्द्यावर बोलताना पत्रकार प्राजक्ता जोशी यांनी, स्थानिकांना त्यांच्या मूळ परिसरा पासून विस्थापित करून आणि पर्यावरणाचा महाविनाश करून राबविला जाणारा तथाकथित विकास कितपत योग्य आहे, असा परखड सवाल उपस्थित केला. विकास हा स्थानिकांच्या गरजा, पर्यावरण आणि संस्कृतीशी सुसंगत असावा, तरच तो खऱ्या अर्थाने शाश्वत ठरेल, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजक अभयसिंह जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजचा समाज हळूहळू जाती पातीच्या भिंतींमध्ये आणि धर्म धंद्यांमध्ये अडकत चालला असून 'देश प्रथम' ही भावना मागे पडत आहे. समाजात वैचारिक प्रबोधन व्हावे, उत्तम विचारांची देवाण घेवाण व्हावी आणि विविध विषयांवर मंथन घडवून आणण्यासाठीच अशा व्यासपीठांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसंवादाच्या माध्यमातून भाषा, संस्कृती, राजकारण आणि सामाजिक प्रश्नांवर झालेली खुली चर्चा उपस्थितांसाठी अत्यंत विचार प्रवर्तक ठरली.
