- Hindi News
- सातारा
- दहिवडीतील मार्डी चौकातील अतिक्रमणा विरोधात नागरिक आक्रमक; १ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा
दहिवडीतील मार्डी चौकातील अतिक्रमणा विरोधात नागरिक आक्रमक; १ सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा
दहिवडीतील मार्डी चौकातील अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा एल्गार. ४ दिवसांत कारवाई न झाल्यास १ सप्टेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा नगरपंचायतीला इशारा.
दहिवडी: दहिवडी शहराच्या मध्यवर्ती भागातील मार्डी चौकात दिवसें दिवस वाढत चाललेल्या बेकायदा अतिक्रमणामुळे सामान्य नागरिक आणि वाहन चालकांची मोठी कुचंबणा होत असून, या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दहिवडी नगरपंचायत प्रशासना विरुद्ध नागरिकांचा रोष उच्चांकावर पोहोचला आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि निष्क्रीय कारभाराचा निषेध म्हणून, आगामी चार दिवसांत मार्डी चौकातील अतिक्रमणावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास येत्या १ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
मार्डी चौकातील हे वाढते अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ते मोकळे करावेत, या प्रमुख मागणीसाठी दादासो शंकर जाधव आणि संभाजी ज्ञानदेव पाटोळे यांनी २८ जुलै २०२६ रोजी दहिवडी नगरपंचायत प्रशासनाला अधिकृतपणे लेखी निवेदन सादर केले होते. या चौकात सार्वजनिक जागेवर व रस्त्यांवर अनधिकृत ताबा घेतल्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना, महिलांना, शाळकरी मुलांना आणि वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, निवेदनाची पायमल्ली करत तब्बल वीस ते पंचवीस दिवस उलटून गेल्यानंतरही नगरपंचायत प्रशासनाने ना कोणती पाहणी केली, ना जागेच्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी केली आणि ना नागरिकांना किंवा तक्रारदारांना कोणतीही ठोस माहिती दिली. प्रशासनाच्या या संथ आणि संशयास्पद भूमिकेमुळे "नगपंचायतीचा नक्की कोणाला पाठबळ आहे आणि प्रशासन कोणाचे भले करत आहे?" असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून विचारला जात आहे.
प्रशासनाच्या अशा टोल वाटोलू आणि हलगर्जी कारभारामुळे संतप्त झालेल्या तक्रार दारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुढील चार दिवसांच्या आत प्रशासनाने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून नियमा नुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई न केल्यास, आगामी १ सप्टेंबर २०२६ रोजी मार्डी चौक येथे लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे शहरात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला सर्वस्वी दहिवडी नगरपंचायत प्रशासनच जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनावर वचक राहावा म्हणून सदर निवेदनाची प्रत माहिती व योग्य कारवाईसाठी दहिवडी पोलीस ठाण्यालाही सुपूर्द करण्यात आली आहे.
