- Hindi News
- पुणे
- पुणे-पिंपरीत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा उद्रेक; आरोग्य विभाग सतर्क
पुणे-पिंपरीत स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा उद्रेक; आरोग्य विभाग सतर्क
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लू व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र वाढ. पुण्यात स्वाईन फ्लूचे २७० तर डेंग्यूचे ९८२ रुग्ण नोंदवले गेले आहेत.
पुणे: राज्यात वातावरणातील सततचे बदल आणि पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, स्वाईन फ्लू, डेंग्यू आणि ताप यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूच्या संसर्गाने वेग घेतला असून, दोन्ही महानगरपालिकांच्या आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. पावसाळ्यामुळे साचलेले पाणी आणि डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल ठरलेल्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या अधिकृत अहवालानुसार, चालू वर्षातील जानेवारी ते जुलै २०२६ या पहिल्या सात महिन्यांच्या काळात शहरात अज्ञात तापाचे तब्बल २१ हजार ५१२ रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत स्वाइन फ्लूचे केवळ ६५ रुग्ण नोंदवले गेले होते; परंतु ऑगस्ट महिन्यात एकाच महिन्यात तब्बल २०५ नव्या रुग्णांची भर पडल्याने यंदाच्या वर्षातील एकूण स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या आता २७० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जानेवारीत एकही रुग्ण नसताना फेब्रुवारीपासून वाढलेला हा संसर्ग आता वेगाने पसरत आहे. याशिवाय, पावसाळ्यात डासांची पैदास वाढल्यामुळे पुण्यात डेंग्यूचे ९८२ आणि चिकुनगुनियाचे १४ रुग्ण आतापर्यंत समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत असून, १ जानेवारीपासून शहरात एच१एन१ (H1N1) चे १९ बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी तब्बल १६ रुग्णांची नोंद केवळ ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांतच झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून नियंत्रणात असलेल्या या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचाही संसर्ग तीव्र झाला असून, जुलैमध्ये १३ असलेले रुग्ण ऑगस्टमध्ये २५ वर पोहोचले आहेत, तर ६२४ संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरात तीस हजारांहून अधिक थंडी-तापाचे रुग्ण नोंदविण्यात आले असून मलेरियाचे तीन आणि चिकुनगुनियाचे दोन रुग्ण आढळले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूवरील आवश्यक औषधोपचार आणि यंत्रणा पूर्णपणे उपलब्ध असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनीही नागरिकांना सर्दी, खोकला किंवा तापाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनां नुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागा मार्फत व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन जुलै महिन्यात तब्बल ४ लाख ७४ हजार ५० घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. वाढत्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची व परिसराची स्वच्छता राखत योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
