- Hindi News
- पुणे
- पुण्यात मध्यरात्री ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनाविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट
पुण्यात मध्यरात्री ४०७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनाविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट
पुणे महापालिकेत (PMC) ४०७ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या. समुपदेशन न करता मध्यरात्री आदेश काढल्याचा कर्मचारी संघटनांचा आरोप.
पुणे: पुणे महानगरपालिकेतून (PMC) प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ४०७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासकीय नियम, संकेत आणि समुपदेशन प्रक्रियेला पूर्णपणे डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने हे आदेश मध्यरात्रीच्या सुमारास जारी केल्याने आणि सध्या कर्मचारी मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) मोहिमेत व्यस्त असताना हा निर्णय घेतल्याने संतापाची लाट पसरली आहे.
महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिकृत फेरबदल यादीनुसार, यात प्रामुख्याने २९५ कनिष्ठ लिपिक, १०० वरिष्ठ लिपिक आणि १२ उपअधीक्षक अशा एकूण ४०७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या बदल्या करताना अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या पदांवर किमान तीन वर्षांचा ठरवून दिलेला कार्यकाळही पूर्ण केला नव्हता, असे समोर आले आहे. तसेच दुसरीकडे, जे कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात चिकटून बसले होते, त्यांना पुन्हा त्याच विभागात सोयीस्कर पदस्थापना दिल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
सामान्यतः महापालिकेत कोणतीही बदली प्रक्रिया राबवताना कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन (Counseling) अनिवार्य मानले जाते. यादरम्यान कर्मचाऱ्यांची वैयक्तिक अडचण, त्यांची सेवा आणि त्यांच्या पसंतीच्या पर्यायांचा विचार करूनच अंतिमादेश काढले जातात. परंतु, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर आणि उपआयुक्त किशोरी शिंदे यांनी ही सर्व अनिवार्य समुपदेशन प्रक्रिया पद्धतशीरपणे टाळून थेट रातोरात बदल्यांची यादी जाहीर केल्याचा आरोप केला जात आहे.
सध्या महापालिकेचे हजारो कर्मचारी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) मोहिमेत अहोरात्र काम करत आहेत. ८ ऑगस्टपर्यंत कर्मचाऱ्यांना या संवेदनशील मोहिमेत पूर्ण वेळ झोकून द्यावे लागणार आहे. अशा महत्त्वाच्या कामाच्या काळातच प्रशासनाने जाणीवपूर्वक बदल्यांचे आदेश काढल्याने कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी किंवा लोक प्रतिनिधींकडे तात्काळ दाद मागता येणार नाही, असा सूर कर्मचारी वर्तुळातून उमटत आहे. एसआयआरच्या कामात कसूर केल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाण्याच्या भीतीमुळे कर्मचारी सध्या उघडपणे आंदोलनही करू शकत नाहीत.
या अचानक झालेल्या बदल्यांमुळे महिला कर्मचाऱ्यांवर सर्वात प्रतिकूल परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. अनेक महिला कर्मचाऱ्यांची शहराच्या एका टोकावरून थेट दुसऱ्या टोका कडेल असलेल्या कार्यालयांत बदली करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना रोजचा लांब आणि त्रासदायक प्रवास करावा लागणार आहे. समुपदेशन झाले असते तर कौटुंबिक परिस्थितीनुसार हा ताण टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया महिला कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, वाढता विरोध पाहता प्रशासनाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले की, "कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे हे आदेश नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून जारी करण्यात आले आहेत. सध्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेत गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या कर्तव्यातून त्वरित मुक्त केले जाणार नाही. ही मोहीम पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणीच राहतील आणि एसआयआरचे काम पूर्ण झाल्यावरच नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील. प्रशासनाने यात पूर्ण खबरदारी घेतली आहे."
असे असले तरी, या मध्यरात्रीच्या मनमानी कारभाराविरुद्ध कर्मचारी संघटना आता आक्रमक पावले उचलण्याच्या तयारीत असून येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
