- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- समाजहितासाठी कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांचा गौरव; ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळा
समाजहितासाठी कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांचा गौरव; ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ सोहळा
मुंबईत मेघाश्रेय फाउंडेशनच्या वतीने 'सर्वोत्तम नागरिक सन्मान २०२६' सोहळा संपन्न. अशोक सराफ, कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्यासह १८ मान्यवरांचा सन्मान.
मुंबई: समाज आणि राष्ट्राच्या प्रगती साठी विविध क्षेत्रांत अहोरात्र उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ गौरवाची बाब नसून, त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून नव्या पिढीला राष्ट्रसेवेची ऊर्जा मिळवून देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे. मुंबईतील प्रतिष्ठित ‘द सेंट रेजिस हॉटेल’ येथील अॅस्टर बॉलरूम मध्ये ‘मेघाश्रेय फाउंडेशन’च्या वतीने आयोजित भव्य आणि दिमाखदार ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान-२०२६’ सोहळ्यात ते बोलत होते.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संघटन प्रभारी रामलाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. विज्ञान, संशोधन, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, संगीत, कला-संस्कृती, चित्रपट, सामाजिक कार्य आणि अध्यात्म अशा विविध प्रांतांत आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडवणाऱ्या देशातील १८ नामवंत व्यक्तींचा या वेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपाल वर्मा म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात आयटी व्यावसायिक, डॉक्टर, कलाकार, उद्योजक आणि समाजसेवक एकत्र येणे ही एक विशेष बाब आहे. केवळ वैयक्तिक यश संपादन करणे पुरेसे नसून, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झाला पाहिजे. भारतीय संस्कृतीतील शिस्त आणि स्वातंत्र्याचा सुंदर समन्वय अधोरेखित करत, विविधतेचा स्वीकार आणि परस्पर आदरातूनच सक्षम समाज निर्माण होतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी बोलताना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जीवनातील मूल्यांवर भाष्य करताना सांगितले की, माणसाच्या आयुष्यात नेहमीच दोन मार्ग असतात; एक सोपा आणि लवकर यशाकडे नेणारा, तर दुसरा मनाला योग्य वाटणारा पण संघर्षाचा मार्ग. जे लोक आत्मविश्वासाने आणि निष्ठेने मनाला योग्य वाटणाऱ्या मार्गावर चालतात, तेच खऱ्या अर्थाने ‘सर्वोत्तम नागरिक’ ठरतात. आज सन्मानित झालेली सर्वच व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यातून समाजमूल्ये जोपासत असून, त्यांचा हा प्रवास भावी पिढीसाठी दीप प्रज्वलित करणारा ठरेल, असे त्यांनी नमूद केले. मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापक सीमा सिंग यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना, निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करून त्यांचा प्रेरणादायी प्रवास युवा पिढीसमोर आणणे हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
१८ मान्यवरांचा गौरव आणि योगदान
मेघाश्रेय फाउंडेशनचा हा मानाचा पुरस्कार यंदाच्या वर्षी संगीत, चित्रपट, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील खालील १८ दिगग्ज व्यक्तींना प्रदान करण्यात आला:
- अशोक लक्ष्मण सराफ: मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील दीर्घ व उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.
- मानद कॅप्टन योगेंद्र सिंह यादव: कारगिल युद्धातील, विशेषतः टायगर हिल मोहिमेतील अतुलनीय शौर्यासाठी परमवीर चक्र विजेते म्हणून गौरव.
- हरिहरन: भारतीय संगीत, पार्श्वगायन आणि गझल क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल.
- जया किशोरी: आध्यात्मिक विचार आणि प्रेरणादायी वक्तृत्वातून युवकांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण केल्याबद्दल.
- रवी किशन: भोजपुरी व हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान तसेच तरुणांमधील लोकप्रियतेसाठी ‘जेन झी ट्रेंडसेटर’ म्हणून सन्मान.
- संजू कपूर (संजीव कपूर): भारतीय पाककलेचा देश-विदेशात प्रसार आणि ब्रँड वाढविण्यात मोलाचे योगदान.
- लक्ष्मी अग्रवाल: ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या हक्कांसाठी दिलेला धीरोदात्त लढा व जनजागृती कार्यासाठी.
- सुभाष घई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शन, निर्मिती आणि चित्रपट शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीसाठी.
- सलीम मर्चंट: भारतीय चित्रपट संगीताला लोक आणि पारंपरिक संगीताची जोड देणारे संगीतकार म्हणून.
- प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी: केमिकल इंजिनिअरिंग, संशोधन आणि वैज्ञानिक क्षेत्रातील नेतृत्वासाठी.
- भूमी पेडणेकर व अभिषेक सिंह: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री व अभिनेता म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल.
- अहमद खान: नृत्यदिग्दर्शन, दिग्दर्शन आणि लेखनातील बहुआयामी योगदानाबद्दल.
- अभिमन्यू सिंह: विविध भारतीय भाषांतील चित्रपटांमध्ये प्रभावी आणि अष्टपैलू अभिनय करण्यासाठी.
- डॉ. जलील डी. पारकर: श्वसनविकार आणि फुफ्फुसाच्या आजारांवरील उपचारांमधील दीर्घकालीन योगदानासाठी.
- केदार जोशी: मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी.
- सुजय जयराज: शालेय शिक्षण, संस्था निर्मिती आणि शैक्षणिक नेतृत्वातील कार्यासाठी.
- डॉ. देवांश धनगर: संगणकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी.
या दिमाखदार सोहळ्यामुळे केवळ गुणवत्तेचा सन्मान झाला नाही, तर उत्कृष्टतेची भावना, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा हा एक ऐतिहासिक सोहळा ठरला आहे.
