- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम; शासन निर्णय जारी
गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्यसेवा होणार अधिक सक्षम; शासन निर्णय जारी
महाराष्ट्रात ग्रामीण ते जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य सेवांची मानके निश्चित. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासन निर्णय जारी; ३०८ प्रकारच्या चाचण्या मिळणार.
मुंबई: राज्यातील सर्व सामान्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गरजे नुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील ग्रामीण रुग्णालयापासून ते उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालया पर्यंत प्रत्येक स्तरावर मिळणाऱ्या आरोग्यसेवेची सर्व समावेशक मानके (Standards) निश्चित केली असून, यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) नुकताच जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता अधिक वाढणार असून नागरिकांचा त्यावरचा विश्वास आणखी दृढ होईल.
या नव्या व्यवस्थेमुळे कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील आणि कोणत्या तपासण्या व सुविधा मिळतील, याची स्पष्ट रूपरेषा तयार झाली आहे. रुग्णालयाच्या क्षमतेनुसार आणि सेवा स्तरामानुसार उपचारांची स्पष्ट रचना करण्यात आली आहे. यामध्ये ३०, ५० आणि १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय अशा विविध स्तरांवर फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट आणि दंतशल्यचिकित्सक यांसारख्या तज्ज्ञ वैद्याकीय सेवांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक उपचारांसाठी किंवा मोठ्या आजारांसाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, तर स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागरिकांना स्थानिक पातळीवरच आधुनिक आणि अचूक निदान सुविधा मिळाव्यात, यासाठी निदानात्मक चाचण्यांचे (Diagnostic Tests) स्पष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६, १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११०, तर जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्या उपलब्ध असणार आहेत. या तिन्ही स्तरांवर मिळून एकूण ३०८ प्रकारच्या चाचण्यांची सुविधा मिळणार असून यात रक्तातील साखरेपासून, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्य तपासण्या, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड, पॅप स्मिअर आणि संसर्गजन्य आजारांच्या चाचण्यांचा समावेश आहे. तसेच क्ष-किरण (X-Ray) आणि सोनोग्राफी सोबतच १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय (MRI) सारख्या अत्याधुनिक निदान सुविधांचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी केवळ यंत्रसामग्री नव्हे तर कुशल मनुष्यबळावरही मोठा भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य संस्थांना अतिरिक्त तज्ज्ञ आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, १,५१९ स्पेशालिस्ट, २,९१९ वैद्यकीय अधिकारी, ३,००५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११,५७१ स्टाफ नर्सचा समावेश आहे. याशिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ आणि रक्तपेढीतील आवश्यक मनुष्यबळ देखील निश्चित करण्यात आले आहे. माता-बाल आरोग्य, डायलिसिस, रक्तपेढी, लसीकरण, प्रसूती कक्ष यांसारख्या महत्त्वाच्या जीवनरक्षक सुविधांसोबतच रुग्णवाहिका, जन्म-मृत्यू नोंदणी, दिव्यांग व वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि तक्रार निवारण यांसारख्या नागरिकाभिमुख सेवांनाही या मानकांमध्ये प्राधान्य देण्यात आले असून यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान होणार आहे.
