- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अमरावतीत रुग्णालयाला आग; व्हेंटिलेटरच्या स्फोटात ३ नवजात बालकांचा मृत्यू
अमरावतीत रुग्णालयाला आग; व्हेंटिलेटरच्या स्फोटात ३ नवजात बालकांचा मृत्यू
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU कक्षात पहाटे भीषण आग. व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू; दोषींवर कारवाईची मागणी.
अमरावती: अमरावती मधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (NICU) पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा जळून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटने मुळे रुग्णालयात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, रुग्णालयाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी कक्षातील सर्वजण गाढ झोपेत होते. अचानक एका व्हेंटिलेटरमध्ये जोरदार स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आग नवजात शिशू कक्षात वेगाने पसरल्यामुळे मोठी धावपळ उडाली. उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बालकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत काहींना सुरक्षित बाहेर काढले, परंतु या भीषण आगीत तीन निष्पाप बालकांचा जीव वाचू शकला नाही. विशेष म्हणजे, आग लागली त्यावेळी रुग्णालयाची फायर अलार्म यंत्रणा कार्यन्वित नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकां कडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी खासदार नवनीत राणा यांनी तातडीने रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आक्रमकपणे केली. तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट नियमित झाले होते का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधला.
यादरम्यान, आमदार रवी राणा यांनीही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारावर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, मी सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि प्रशासनाच्या संपर्कात आहे. यापूर्वी, तिन वर्षांपूर्वी याच नवीन इमारतीत अशाच प्रकारची आग लागण्याची घटना घडली होती. तरीही प्रशासनाने योग्य तो धडा घेतलेला नाही, पुन्हा अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे. डॉक्टर, कर्मचारी आणि एकूणच यंत्रणेच्या बेफिकीर पणामुळेच चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमरावती येथील या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शासकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाकण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
