- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप; २२ महिलांवर कारवाई
पालघरच्या मोखाड्यात धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप; २२ महिलांवर कारवाई
पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात १८ वर्षीय तरुणाला आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप. मोखाडा पोलिसांकडून २२ महिलांवर गुन्हा दाखल.
पालघर: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात धर्मांतराचा एक खळबळ जनक प्रकार उघडकीस आला आहे. मोखाड्यातील वाकडपाडा येथे एका १८ वर्षीय तरुणाला धार्मिक साहित्याचे पुस्तक देऊन आजार व समस्या दूर होण्याचे आमिष दाखवत धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारी वरून मोखाडा पोलीस ठाण्यात तब्बल २२ महिलां विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे आदिवासी भागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसां कडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील रहिवासी असलेला १८ वर्षीय अक्षय संतोष कान्हात याच्या घरी काही महिला आल्या होत्या. त्यातील एका महिलेने त्याच्या हातात धार्मिक साहित्याचे एक पुस्तक सोपवले आणि ते पुस्तक वाचल्यास घरातील सर्व आजार व समस्या चमत्कारीक रीतीने दूर होतील असा दावा केला. मात्र, अक्षयने हे पुस्तक घेण्यास आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास साफ नकार दिला. यावर संतापलेल्या संबंधित महिलेने अक्षयच्या धार्मिक श्रद्धांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली, ज्यामुळे तरुणाच्या आणि कुटुंबीयांच्या भावना दुखावल्या.
या प्रकारानंतर अक्षयने तात्काळ घडलेली हकीकत आपल्या गावातील नागरिकांना आणि भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद झोले यांना सांगितली. ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित महिलांची विचारपूस केली असता, त्या महिला कुसुम कामडी यांच्या ओळखीने आणि सत्यवती कुंचे यांच्या माध्यमातून आल्याचे समोर आले. या प्रकारामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गावकऱ्यांनी या सर्व महिलांना तात्काळ खोडाळा पोलीस चौकीत नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, पीडित तरुण अक्षय कान्हात याने मोखाडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात अधिकृत लिखित तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पावले उचलत २२ महिलां विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे करत आहेत. दरम्यान, मोखाडा सारख्या दुर्गम आणि आदिवासी भागात अशा प्रकारे धार्मिक साहित्याचा आडोसा घेऊन आजार बरे करणे किंवा समस्या दूर करण्याचे खोटे आमिष दाखवून नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढीस लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा गैर प्रकारांमुळे आदिवासी भागातील नागरिकांमध्ये अंधश्रद्धा किंवा गैरसमज पसरू नयेत, यासाठी प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बन्सी हमरे यांनी म्हटले आहे.
