- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी प्रशिक्षणाला मुदतवाढ; १.६५ लाखांहून अधिक चालकांना लाभ
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी प्रशिक्षणाला मुदतवाढ; १.६५ लाखांहून अधिक चालकांना लाभ
राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाला मुदतवाढ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; १.६५ लाख चालकांना लाभ.
मुंबई: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधता यावा यासाठी परिवहन विभागाच्या सामाजिक बांधिलकीतून हाती घेण्यात आलेला विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. या १०५ दिवसांच्या विशेष मोहिमेत आता पर्यंत राज्यातील तब्बल १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे धडे देण्यात आले आहेत. हा महत्त्वपूर्ण उपक्रम आगामी काळातही असाच अखंडितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
मंत्रालयात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला प्रसिद्ध कामगार नेते शशांक राव यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी राबवलेल्या या भाषा प्रशिक्षण उपक्रमाला चालकांकडून अत्यंत सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्राची समृद्ध अस्मिता आणि संस्कृतीचा आदर राखण्याची महत्त्वपूर्ण भूमिका या चालकांनी दाखवली असून, याबद्दल त्यांनी चालकांचे अभिनंदन केले. ज्या चालकांना अद्याप मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यांच्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून कार्यशाळा नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई-विरार आणि नवी मुंबई या परिसरांमधील प्रशिक्षण केंद्रांची सविस्तर यादी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयांना आधीच सुपूर्द करण्यात आली आहे. चालकांना या केंद्रांची सहज आणि वेळेत माहिती मिळावी, यासाठी आरटीओच्या माध्यमातून लवकरच एक स्वतंत्र हेल्पलाईन किंवा संपर्क क्रमांक देखील जाहीर केला जाणार आहे. कामगार नेते शशांक राव यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, मराठी भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्या चालकांसाठी एक महिन्याची प्रारंभिक मुदत दिली जाणार असून, या कालावधीत चालकांना मराठी आत्मसात करण्याची पूर्ण संधी मिळेल. त्यानंतरही जर कोणी जाणीव पूर्वक मराठी भाषा शिकण्यास नकार दिला, तर नियमा नुसार त्यांचे ड्रायव्हिंग बॅज रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही मंत्र्यांनी दिला.
मुंबई आणि ठाणे परिसरातील शांतता व सलोख्याचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांकडून केला जात असल्याचे निदर्शनास आणून देत, नागरिकांनी आणि चालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले. रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या पदाधिकारी आणि नेत्यांशी शासन सतत संवाद साधत असून, त्यांच्या सर्व मागण्या व सूचनांचा विचार करून कोणावरही अन्यायकारक किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
