श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा राजू शेट्टींचा आरोप. उसाला प्रतिटन ५५०० रुपये दराची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा.

फलटण: राज्यातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यां पैकी एक असलेल्या फलटण येथील 'श्रीराम सहकारी साखर कारखाना' बंद पाडण्यासाठी थेट राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सहकारी साखर कारखाने आधीच विविध अडचणींचा सामना करत असताना, दुसरीकडे खासगी कारखान्यांना जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले जात आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी शासन धोरणांवर कडाडून टीका केली आहे. फलटण येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी देशातील साखर बाजारातील अनिर्बंध दरवाढीवर आणि उत्पादनावर लक्ष वेधले. गतवर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये साखरेचा दर सुमारे ३७०० रुपये प्रति क्विंटल होता, जो यंदाच्या ऑगस्टमध्ये थेट ६७०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. एका वर्षाच्या कालावधीत साखरेच्या दरात तब्बल ३००० रुपयांची वाढ झाली असून, अलीकडच्या काळात किलोमागे २० रुपयांची अचानक झालेली वाढ थक्क करणारी आहे. देशात २०२४-२५ मध्ये २६० लाख टन आणि २०२५-२६ मध्ये २९० लाख टन साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. त्यातच मागील हंगामातील ५० लाख टनांचा प्रारंभिक साठा शिल्लक असतानाही, देशात साखरेचा तुटवडा नसताना दर गगनाला भिडण्या मागील नेमके कारण काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच, साखरेच्या वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार का, असा परखड प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. सध्याच्या बाजार भावानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन किमान ५५०० रुपये दर मिळणे आवश्यक असून, मागील वर्षी पुरवलेल्या ऊसा साठी अतिरिक्त १००० रुपये प्रतिटन देण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.

     श्रीराम कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा एक प्रकल्प नसून, तो फलटण तालुक्यातील हजारो शेतकरी, मजूर, वाहतूकदार आणि या उद्योगावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांच्या अर्थकारणाचा कणा आहे. हा कारखाना पूर्ववत सुरू झाल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्या बरोबरच वाहतूक, व्यापार आणि पूरक व्यवसायांना मोठी गती मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. मात्र, कारखाना दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचा अत्यंत विपरीत परिणाम संपूर्ण परिसराच्या आर्थिक घडीवर होईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत श्रीराम कारखाना सुरू झालाच पाहिजे, हीच सर्व शेतकरी व सभासदांची मुख्य मागणी आहे. कारखाना त्वरित सुरू करण्यासाठी आणि शासनावर योग्य तो दबाव आणण्यासाठी गरज भासल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा कडक  इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी

Latest News

जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; प्रश्नावली बदलण्याची खर्गे-राहुल गांधींची मागणी
केंद्र सरकारच्या जातगणनेच्या प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप. खुल्या प्रश्नांऐवजी 'ड्रॉपडाउन' पर्याय ठेवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र.
लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची तयारी? २०२९ वर केंद्राचा विचार
पुण्यात अवैध गुटख्यावर पोलिसांचा दणका; वडगाव शेरीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा सरकारचा डाव; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम; ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन चाचणी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software