एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; १ ऑक्टोबर पासून महिला-ज्येष्ठांच्या सवलतीच्या तिकिटासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबर २०२६ पासून एसटी बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य. महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी नोंदणी प्रक्रिया व सविस्तर माहिती.

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेत प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आगामी १ ऑक्टोबर २०२६ पासून एसटी बसमधून प्रवास करताना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी ‘एनसीएमसी’ (NCMC - National Common Mobility Card) कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे एसटीचा सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, राज्यभरातील सर्व आगार आणि प्रमुख बसस्थानकांवर या कार्डच्या नोंदणी व वितरणाची मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

         एसटी महामंडळा कडून शासन निर्देशा नुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने अमृत ज्येष्ठ नागरिक, नियमित ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. या सर्व सवलतधारक प्रवाशांच्या प्रवासाचे अचूक आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड प्रणालीचा प्रभावी वापर केला जात आहे. येत्या १ ऑक्टोबर पासून एसटीची सवलतीची तिकिटे केवळ याच कार्डच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे संबंधित सर्व पात्र प्रवाशांनी या निर्धारित मुदती पूर्वी आपले एनसीएमसी कार्ड नोंदवून घेणे किंवा काढून घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनसीएमसी कार्ड असेल किंवा कार्ड नोंदणी केल्याची अधिकृत क्यूआर (QR) कोड असलेली पावती असेल, त्यांनाच या सवलतीचा लाभ घेता येणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

          कार्ड नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मिळणारी ही क्यूआर कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम (ETM) मशीनवर स्कॅन करून आपले सवलतीचे तिकीट सहज काढता येईल. ही नोंदणी पावती ३० दिवसांच्या कालावधीसाठी ग्राह्य धरली जाणार असून, या निर्धारित मुदतीत प्रवाशांनी आपले एनसीएमसी कार्ड ॲक्टिव्ह करून त्यात आवश्यक ते टॉप-अप (Top-up) करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एनसीएमसी कार्डच्या नोंदणी व वितरणाचे अधिकार ‘ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आले असून, त्यांची एसटी बसस्थानके, आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरही अधिकृत एजंट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या अधिकृत केंद्रावर जाऊन कार्ड नोंदणी करणे सोपे झाले आहे. तसेच, कार्डमध्ये सहजतेने रक्कम भरण्यासाठी ‘भीम’ (BHIM App) द्वारे टॉप-अप करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, कार्डच्या मागील बाजूस असलेला क्यूआर कोड स्कॅन करून ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

          दरम्यान, नोंदणी प्रक्रिये दरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांना बायोमेट्रिक प्रणालीत बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महामंडळाने एका पर्यायी व्यवस्थेचीही सोय केली आहे. आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या वन-टाइम पासवर्डच्या (OTP) आधारे नोंदणी करण्याची कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे तांत्रिक अडचण असलेल्या प्रवाशांचा मार्ग सुकर झाला आहे. सवलतीचा प्रवास पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक आणि कागदविरहित करण्याच्या दृष्टीने ही प्रणाली मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे सर्व पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन लवकरात लवकर आपले एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?

Latest News

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?  पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?
पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक आणि उत्साही गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एकूण ३३ तास २७ मिनिटांत अत्यंत शांततेत व उत्साहात पार...
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
गणेशोत्सवात पुणे मेट्रोची विक्रमी भरारी; १२ दिवसांत ४८ लाखांहून अधिक प्रवासी, ७.४९ कोटींची कमाई
पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक; शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले, आंदोलनाचा इशारा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software