- Hindi News
- गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० ला...
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे:
गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे मोबाईल लांबवणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा शिवाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ११ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ६३ महागडे मोबाईल आणि एक शेवरलेट क्रुझ कार असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नदीपात्राजवळ रचला होता कट
२६ सप्टेंबर रोजी जंगलीजमीन, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि पालिका परिसरात विसर्जन मिरवणुकीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर शिवाजीनगर पोलिसांचे निगराणी पथक लक्ष ठेवून होते. याच दरम्यान, खुडे ब्रिजजवळील नदीपात्रात काही संशयित हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत थांबल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली.
मालेगाव आणि वाशीमच्या आरोपींचा समावेश
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचून ११ जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मालेगाव (जि. नाशिक) येथील अब्दुल कादीर नुर मोहम्मद (२८), अब्दुल मालीक अब्दुल खालीक (२२), जीयाऊ रहेमान शौकत हुसेन (२६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल (३१), फैसल अजीज खान (२४), हुजेफा अंजुम मोहमंद साजीद (३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (३५), अझर अहेमद अल्लाफ अहेमद मोमीन (३०), नावेद अख्तार शफीक अहमद अन्सारी (३३), अतहर अहमद एजाज अहमद (२३) आणि वाशीम जिल्ह्यातील अतुल मारोती इंगळे (२४) यांचा समावेश आहे.
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ६३ मोबाईल फोन, कारसह दोन सुरे, कटर आणि लाल मिरची पावडर जप्त केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.
ही धडक कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त कृषिकेश रावले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निगराणी पथकाने पार पाडली.
