मुंबईकरांनो, रविवारच्या प्रवासाचे नियोजन करा! मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक

२७ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर रात्री जम्बो ब्लॉक. प्रवासापूर्वी तपासा लोकलचे सुधारित वेळापत्रक.

मुंबई: गणेशोत्सवाच्या आनंदाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता; मात्र आता हा सणाचा काळ संपताच पुन्हा एकदा मुंबईकरांच्या लोकल प्रवासात अडथळे निर्माण होणार आहेत. उद्या म्हणजेच रविवार, २७ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर विहित कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज शनिवारी मध्यरात्री पासूनच जम्बो ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या नियोजित तांत्रिक कामांमुळे रविवारी दिवसभर धावणाऱ्या उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल होणार असून, काही लोकल फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या धीम्या किंवा जलद मार्गावर वळवून चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या लाखो मुंबईकरांना काही प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

          मध्य रेल्वे प्रशासना कडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही जलद मार्गावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४५ मिनिटा पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. या ब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकाजवळ डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या सर्व ठरलेल्या स्थानकांवर थांबून मार्गस्थ होतील आणि या प्रवासात सुमारे १५ मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील. त्यानंतर मुलुंड स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावर आणल्या जातील. याचप्रमाणे, ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या सर्व अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून माटुंगा स्थानकानंतर त्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. या मार्गावरील सर्व गाड्यांना १५ मिनिटांचा विलंब अपेक्षित आहे. तसेच खोपोलीहून दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली-CSMT लोकल आता नियोजित वेळेत बदल करून दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.

          मुख्य मार्गासोबतच हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही या ब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटा पासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटा पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात CSMT येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत CSMT कडे येणाऱ्या सर्व नियमित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत CSMT ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान काही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या नेहमीप्रमाणे रविवारच्या वेळापत्रका नुसारच धावतील. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी किंवा नेरुळ मार्गे प्रवास करण्याची विशेष मुभा रेल्वे प्रशासना कडून देण्यात आली आहे.

         दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नसला तरी रात्रीच्या प्रवाशांसाठी जम्बो ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकां दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार, २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.३० या वेळेत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जातील. विरार, वसई रोड, बोरीवली आणि भाईंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बदलामुळे काहीसा त्रास होऊ शकतो; मात्र रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत राहणार आहे. रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक कामे सुरळीत पार पाडण्यासाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे प्रशासना कडून स्पष्ट करण्यात आले असून, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईकरांनी आपल्या रेल्वे प्रवासाचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?

Latest News

पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?  पुण्यात ३३ तासांत गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण! मानाचे गणपती व 'दगडूशेठ' हलवाईंच्या विसर्जनाची वेळ काय होती?
पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक आणि उत्साही गणेश विसर्जन मिरवणूक यंदा एकूण ३३ तास २७ मिनिटांत अत्यंत शांततेत व उत्साहात पार...
गणपती विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांकडून ११ जणांना अटक, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
गणेशोत्सवात पुणे मेट्रोची विक्रमी भरारी; १२ दिवसांत ४८ लाखांहून अधिक प्रवासी, ७.४९ कोटींची कमाई
पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक; शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले, आंदोलनाचा इशारा

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software