- Hindi News
- पुणे
- पुण्यात वृद्ध डॉक्टरला घरात घुसून मारहाण; ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह साथीदारांवर गुन्हा
पुण्यात वृद्ध डॉक्टरला घरात घुसून मारहाण; ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह साथीदारांवर गुन्हा
पुण्यात 'बिग बॉस मराठी' फेम दिव्या शिंदे आणि साथीदारांनी माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ५ लाखांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल.
पुणे: पुण्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वर्तुळात एक अत्यंत खळबळजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांनी एका कार्यक्रमाच्या प्रसिद्धी मोबदल्यात तब्बल पाच लाख रुपयांची खंडणीसदृश मागणी करत, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा पक्षाघाताचे रुग्ण असलेल्या ६५ वर्षीय डॉक्टरला त्यांच्याच राहत्या घरात घुसून अत्यंत क्रूरपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे यांच्यासह ८ ते १० जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, या प्रकरणातील पीडित ६५ वर्षीय डॉक्टर विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावरून २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले असून ते ‘करुणादीप फाउंडेशन’चे सक्रिय सदस्य आहेत. या संस्थेच्या माध्यमातून १ ते ३ सप्टेंबर दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीचे काम केल्याचा दावा करत दिव्या शिंदे हिने ऑगस्ट महिन्या पासून डॉ. गायकवाड यांच्याकडे फोन आणि संदेशांच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची मागणी सुरू केली होती. मात्र, संस्थेच्या वतीने किंवा डॉ. गायकवाड यांच्याकडून दिव्या शिंदे यांना कोणतेही अधिकृत आमंत्रण देण्यात आले नव्हते तसेच प्रसिद्धी बाबत कोणताही व्यावसायिक करारही झाला नव्हता, असे समोर आले आहे. असे असतानाही आरोपींकडून सातत्याने आर्थिक तगादा लावला जात होता.
हा वाद हळूहळू हिंसक वळण घेत गेला. १७ सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि त्यांचे काही साथीदार थेट डॉ. गायकवाड यांच्या घरी गेले होते. त्या वेळी डॉक्टर घरी नसल्याने त्यांच्या पत्नी व मुलाला दमदाटी करून आरोपी निघून गेले. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी आण्णा ढमढेरे याने डॉ. गायकवाड यांना फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावले आणि पुन्हा एकदा ५ लाखांची मागणी करत पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसे पाठवून जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा सर्व वाद टोकाला पोहोचला. जेव्हा डॉ. गायकवाड घरी एकटेच होते, तेव्हा आण्णा ढमढेरे त्यांच्या घरी आला आणि दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह ८ ते १० जणांनी घरात बळजबरीने प्रवेश केला.
डॉ. गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे (Paralysis) रुग्ण असून आपली प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगून हात जोडले आणि मारहाण थांबविण्याची विनंती केली; परंतु हल्लेखोरांनी त्यांच्या एकाच ऐकले नाही. आरोपींनी त्यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता एका हल्लेखोरााने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केला, तर इतरांनी दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्यांचा वापर करून त्यांना गंभीर जखमी केले. या भयानक हल्ल्यात घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. काही वेळाने डॉक्टरचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि जाताना आरोपी डॉ. गायकवाड यांची कार बळजोरीने घेऊन पसार झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. कुठलाही संबंध नसताना आणि कायदेशीर करार न केलेल्या प्रकरणात एका वृद्ध आणि दुर्बल वैद्यकीय अधिकाऱ्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे कला आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
