- Hindi News
- देश
- Asian Games 2026: भारताची कबड्डीत ऐतिहासिक ‘गोल्डन डबल’; पुरुष-महिला संघाने इराणला हरवत जिंकली सुवर्...
Asian Games 2026: भारताची कबड्डीत ऐतिहासिक ‘गोल्डन डबल’; पुरुष-महिला संघाने इराणला हरवत जिंकली सुवर्णपदके
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय कबड्डी संघाची ऐतिहासिक कामगिरी. पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी इराणला नमवून जिंकले सुवर्णपदक.
नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या क्रीडापटूंनी पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात देशाचा तिरंगा डौलाने फडकवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कबड्डीच्या पटलावर भारताचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत पुरुष आणि महिला दोन्ही राष्ट्रीय संघांनी सुवर्णपदकांवर आपली सुवर्णमोहर उमटवली आहे. महिला संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात विजयाची परंपरा राखत सुवर्णपदक जिंकल्या नंतर, भारतीय पुरुष कबड्डी संघानेही अंतिम सामन्यात बलाढ्य इराणचा ४०-३४ अशा दणदणीत फरकाने पराभव करत सुवर्ण पदकावर दिमाखात नाव कोरले. विशेष म्हणजे, पहिल्या हाफमध्ये अल्पशा फरकाने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या हाफमध्ये खेळाची संपूर्ण रणनीती बदलत केलेल्या अभूतपूर्व आणि दमदार पुनरागमनाच्या बळावर हा सनसनाटी विजय मिळवला आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये इराणने भारतीय संघावर १८-१७ अशी अत्यंत अल्पशी आघाडी घेतली होती, ज्यामुळे सामना अत्यंत काटे की टक्कर होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मध्यांतरा नंतरच्या दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघाने खेळाची सूत्रे आपल्या हातात घेत अप्रतिम आक्रमक खेळ केला. भारताने या उत्तरार्धात तब्बल २३ गुण वसूल करत इराणला केवळ १६ गुणांवर रोखण्यात यश मिळवले. या निर्णायक टप्प्यात भारतीय बचावफळीने अत्यंत अचूक आणि शिस्तबद्ध खेळ करत इराणला 'ऑलआऊट' केले आणि सामन्यावरील आपली पकड पूर्णपणे मजबूत केली. इराणच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचे केलेले सर्व प्रयत्न भारतीय खेळाडूंनी कौशल्याने हाणून पाडले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
या ऐतिहासिक विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष कबड्डीचे तब्बल नववे सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आहे. १९९० मध्ये कबड्डीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत अधिकृत समावेश झाल्यापासून भारतीय पुरुषांच्या संघाने या क्रीडा प्रकारात सातत्याने आपले अजेय वर्चस्व कायम ठेवले आहे. २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत काही तांत्रिक कारणांमुळे भारताचे सुवर्ण पदक हुकले होते; परंतु २०२२ च्या हांगझोऊ स्पर्धेत भारताने जोरदार पुनरागमन करत पुन्हा सुवर्ण पदक पटकावले आणि आता २०२६ च्या या महाकुंभा मध्येही आपले विजेतेपद दिमाखात कायम राखले आहे.
पुरुष संघाप्रमाणेच भारताच्या महिला कबड्डी संघानेही अंतिम सामन्यात इराण विरुद्ध ३७-३४ असा रोमांचक विजय मिळवत सुवर्ण पदक आपल्या झोळीत टाकले. महिला संघाचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे चौथे सुवर्ण पदक ठरले आहे. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये इराण विरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढत २०२२ मध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाने २०२६ मध्येही आपली विजयी परंपरा कायम राखत विजेतेपदाचा बचाव केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील या ऐतिहासिक 'गोल्डन डबल' कामगिरीमुळे भारताच्या कबड्डी क्षेत्रातील निर्विवाद श्रेष्ठत्वाची आणि ताकदीची परंपरा पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झाली असून, संपूर्ण देशातून विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
