- Hindi News
- पुणे
- पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
पुणे विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा भामटा जेरबंद; बनावट ओळखपत्र दाखवून उकळत होता हजारो रुपये
पुणे विमानतळावर विमान चुकल्याचे भासवून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मोदेला व्यंकटा दिनेशकुमार या आरोपीला CISF ने रंगेहाथ पकडले.
पुणे: पुणे विमानतळावर प्रवाशांना भावनिक दृष्ट्या अडकवून आणि आपण विद्यार्थी असल्याचे भासवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका चलाख भामट्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) गुप्तचर विभागाने अत्यंततुर्क व सतर्कतेने रंगेहाथ जेरबंद केले आहे. विमानतळावर विमान चुकल्याचे नाटक करत आणि घरी जाण्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून प्रवाशा कडून हजारो रुपये उकळणाऱ्या या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. मोदेला व्यंकटा दिनेशकुमार (वय २८, रा. रत्नपुरी कॉलनी, मल्लिकार्जुन पेठ, गुंटुर, आंध्रप्रदेश) असे या गजाआड गेलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, विमानतळावर सीआयएसएफच्या गुप्तचर शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम मुन्निदर सिंह यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसा पासून विमानतळ परिसरातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांची दिशाभूल करून पैसे उकळल्याच्या तक्रारी विमानतळ प्राधिकरणाकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हा संशयित तरुण विमानतळावर येऊन आपण एक विद्यार्थी असून आपले मुळ गावाकडे जाणारे विमान चुकले आहे, असे सांगून प्रवाशांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेत असे. विमानतळावरून बाहेर पडण्याच्या गेटजवळ थांबून तो प्रवाशांना घर गाठण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्याकरिता तातडीने पैशांची निकड असल्याचे भासवित असे. घरी पोहोचताच तुमचे पैसे ऑनलाइन किंवा थेट परत करेन, असा विश्वास देत त्याने यापूर्वीच वेगवेगळ्या प्रवाशा कडून १८ हजार ६०० रुपयांची आणि अन्य एकाकडून १२ हजार रुपयांची रोकड लाटल्याचे समोर आले आहे.
हा सर्व प्रकार २४ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. विमानतळावरील प्रस्थान गेट क्रमांक १ परिसरात सीआयएसएफचे उपनिरीक्षक ऋषिकेश गुर्जर हे दैनंदिन गस्त घालत असताना त्यांना एक तरुण अत्यंत संशयास्पद हालचाली करत दुसऱ्या एका प्रवाशाकडून पैसे स्वीकारताना निदर्शनास आला. त्यांनी तत्परता दाखवत एसओसीसी (SOCC) रूममधून फिर्यादी पुरुषोत्तम मुन्निदर सिंह यांना याची तातडीने माहिती दिली. माहिती मिळताच फिर्यादी आणि त्यांचे पथक घटनास्थळी धडकले, तेव्हा तो तरुण एका प्रवाशाकडून डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यावर, या तरुणाने तेलंगणा येथील श्रीकांत दान्नय्या मोटे या प्रवाशाला आपले हैदराबादचे विमान चुकल्याचे सांगून त्याच्याकडून तब्बल ११ हजार रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याच्या ओळखीबद्दल विचारणा केली, तेव्हा त्याने आपली खोटी ओळख लपवण्यासाठी एका विद्यापीठाचे ओळखपत्र पुढे केले, ज्यावर 'अल्लुरु शाम प्रसाद' असे नाव नमूद होते. मात्र, सीआयएसएफच्या अनुभवी जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा त्याच्यावर तीव्र संशय बळावल्याने त्यांनी त्याच्याकडे अधिकृत कागदपत्रे व ओळख पटवण्यासाठी इतर पुराव्यांची मागणी केली. जेव्हा त्याचे आधार कार्ड तपासण्यात आले, तेव्हा त्याच्या खऱ्या नावाचा आणि मूळ ओळखीचा पर्दाफाश झाला, ज्यानुसार त्याचे नाव मोदेला व्यंकटा दिनेशकुमार असल्याचे समोर आले आणि त्याने प्रवाशांना फसवण्यासाठी दिलेले विद्यापीठाचे ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. प्रवाशांची दिशाभूल करून त्यांच्याकडून आर्थिक लाटणाऱ्या या भामट्याला सीआयएसएफच्या पथकाने तात्काळ ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गाडे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
